For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन पंजाब’

06:33 AM Jan 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे ‘मिशन पंजाब’
Advertisement

पंजाबमध्ये भाजपकडून सैनींना महत्त्वाची जबाबदारी

Advertisement

वृत्तसंस्था/ पतियाळा

पंजाबमध्ये 2027 च्या प्रारंभी प्रस्तावित विधानसभा निवडणुकीवरून भाजपने रणनीतिला वेग दिला आहे. निवडणुकीपूर्वी राज्यात पक्षाच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांना सोपविली आहे. याचनुसार मुख्यमंत्री सैनी यांनी रविवारी पंजाबचा दौरा करत थेट भाजप कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. मुख्यमंत्री सैनी हे पतियाळा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांच्या एका बैठकीतही सामील झाले. पंजाबमध्ये संघटनात्मक स्वरुपात पक्ष कार्यकर्त्यांशी औपचारिक संवाद साधण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे.

Advertisement

यापूर्वी ते पंजाबमधील शेतकरी समूह, सामाजिक संघटना, युवावर्ग आणि व्यावसायिकांच्या संस्थांसोबत वेगवेगळ्या बैठकांमध्ये सामील होत राहिले आहेत. तर रविवारचा त्यांचा दौरा केवळ पतियाळापुरती मर्यादित राहिलेला नाही. पतियाळानंतर ते स्वत:च्या कॅम्प कार्यालयात पंजाबच्या सुमारे 200 उद्योजकांना भेटले आहेत. यानंतर मोहाली येथे आयोजित विशाल सामूहिक श्री सुंदरकांड पठणातही ते सहभागी झाले. पंजाबमध्ये मोठे राजकीय यश मिळविण्याचा प्रयत्न भाजपने चालविला असून याकरता सैनी हे मोठी भूमिका बजावणार असल्याचे मानले जातेय.

शनिवारी सैनी यांनी निहंग संप्रदायाच्या प्रतिनिधींची भेट घेतली होती. सुमारे दीड वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री सैनी यांचा हरियाणाच्या राजकारणातील आलेख चांगलाच वाढला आहे. त्यांची कार्यशैली आणि सक्रीय राजकीय भूमिकेमुळे पक्षनेतृत्वाच्या नजरेत ते ऊर्जावान आणि प्रभावी मुख्यमंत्र्यांच्या यादीत सामील झाले आहेत.

भाजप नेतृत्वाने आता सैनी यांना पंजाबमधील पक्षाची जबाबदारी सोपविली आहे. मागील काही काळापासून मुख्यमंत्री सैनी हे पंजाबमधील लोकप्रिय गायकांना नियमित स्वरुपात भेट आहेत. या बैठकांमध्ये ते हरियाणा सरकारच्या चित्रपट धोरणावर चर्चा करण्यासोबत पंजाबच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणावरून फीडबॅकही घेत असतात.

मागील 6 महिन्यांमध्ये पंजाबी गायक मनकीरत औलख, मिका सिंह, इंद्रजीत निक्कू आणि गुरदास मान यांना सैनी भेटले आहेत. अलिकडेच सैनी यांनी सतिंदर  सरताज यांना विशेष स्वरुपात स्वत:च्या निवासस्थानी आमंत्रित केले, जेथे त्यांनी हिंद की चादर ही गाणेही ऐकले आहे.

सैनी ठरले महत्त्वपूर्ण

हरियाणा आणि पंजाब सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यापाराच्या स्वरुपाने परस्परांशी अत्यंत जोडलेले आहेत. मुख्यमंत्री सैनी यांचे आजोळ पंजाबमध्ये असून तेथील भाषा, संस्कृती आणि सामाजिक संरचनेची त्यांना चांगलीच कल्पना आहे. पंजाबच्या अनेक क्षेत्रांमध्ये सैनी समुदायाचा प्रभाव असल्याचे मानले जाते. शांत स्वभाव, संतुलित प्रतिमा आणि गरज पडल्यास आक्रमक राजकीय शैलीमुळे नायब सिंह सैनी पंजाबमध्ये पक्षासाठी उपयुक्त चेहरा ठरू शकतात अशी भाजपला अपेक्षा आहे. दीर्घकाळापासून भाजपला पंजाबमध्ये सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणाऱ्या नेत्याचा शोध होता, या निकषात सैनी उपयुक्त ठरतात.

माजी सैनिकांचा मुद्दा

माजी सैनिकांशी निगडित मुद्द्यांवर उपायांवरुन हरियाणा सरकार पूर्णपणे तत्पर असल्याचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी म्हटले आहे. सैनी यांनी शनिवारी पश्चिम कमांडचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी तेथील संग्रहालयाची पाहणी केली, जेथे कमांडचा गौरवशाली इतिहास, प्रमुख सैन्य अभियानं, शौर्याच्या गाथा आणि विकसित सैन्य परंपरांची माहिती त्यांनी जाणून घेतली. पश्चिम कमांड पोहोचल्यावर लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी त्यांचे स्वागत केले. कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांना कमांडच्या प्रमुख कामगिरींविषयी विस्तृत माहिती दिली. यात ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन राहत, युवा संपर्क कार्यक्रम, लॉजिस्टिक सपोर्ट सिस्टीम आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती देण्यात आली.

सैनी यांचे पंजाब मिशन

पंजाबमधील भाजप कार्यकर्त्यांशी साधला थेट संवाद

राज्यातील 200 उद्योजकांशी विविध मुद्द्यांवर चर्चा

पंजाबच्या लोकप्रिय गायकांशी नियमित स्वरुपात संवाद

Advertisement
Tags :

.