हरियाणा विधानसभा विसर्जित
आता नवीन सरकार स्थापनेपर्यंत नायब सैनी हंगामी मुख्यमंत्री
वृत्तसंस्था/चंदीगड
हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी 14 वी विधानसभा विसर्जित केली आहे. विधानसभा बरखास्त करण्याची राज्य सरकारची शिफारस स्वीकारून राज्यपालांनी नायब सैनी यांना नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हंगामी मुख्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारण्यास सांगितले आहे. राज्यात 5 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुका होणार असून त्याचे निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहे. त्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार आहे.
गेल्या सहा महिन्यात विधानसभेचे अधिवेशन बोलवता न आल्याचे घटनात्मक संकट टळण्यासाठी राज्य सरकारने कार्यकाळ पूर्ण होण्याच्या 52 दिवस आधी विधानसभा बरखास्त केली आहे. अशा घटनात्मक पेचप्रसंगानंतर विधानसभा बरखास्त करण्याची ही पहिलीच घटना आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर अशी परिस्थिती कोणत्याही राज्यात कधीच उद्भवली नव्हती. कोरोनाच्या काळातही असे संकट टाळण्यासाठी हरियाणामध्ये एक दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आले होते. याआधीही हरियाणा विधानसभा तीनवेळा बरखास्त करण्यात आली होती, मात्र मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठी तसे करण्यात आले होते.
विधानसभा बरखास्त करण्याची अधिसूचना राजभवनाने गुऊवारी जारी केली. बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या संदर्भातील पत्र राज्यपालांना पाठवण्यात आले. सध्याच्या 14 व्या विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबरपर्यंत असला तरी घटनात्मक बंधनामुळे सरकारला आधी विधानसभा विसर्जित करावी लागली.