कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हार्वर्ड विद्यापीठाची न्यायालयात धाव

06:50 AM Apr 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात खटला : 2.2 अब्ज डॉलर्सचा निधी रोखल्याचे प्रकरण

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रम्प प्रशासनाने विद्यापीठावर राजकीय दबाव टाकत शैक्षणिक कामकाजावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप हार्वर्डने केला आहे. ट्रम्प प्रशासनाची ही कृती विद्यापीठाच्या घटनात्मक अधिकारांचे  उल्लंघन करणारी असल्याचा दावाही हार्वर्डने केला आहे.

ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाचा 2.2 अब्ज डॉलर्सचा निधी रोखला आहे. तसेच ऑक्टोबर 2023 नंतर विद्यापीठ परिसरात झालेल्या ज्यूविरोधी घटनांवर आधारित सर्व अहवाल आणि मसुदा अहवाल सोपविण्याची मागणी ट्रम्प प्रशासनाने केली आहे. याचबरोबर हे अहवाल तयार करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची नावे सांगण्यात यावीत आणि त्यांना संघीय अधिकाऱ्यांच्या मुलाखतीसाठी उपलब्ध करविण्यात यावे असे ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच ट्रम्प प्रशासनाने आता संबंधित विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विदेशी विद्यार्थ्यांची पार्श्वभूमी पडताळून पाहण्याचे सत्र आरंभिले आहे. यामुळे नव्या शैक्षणिक सत्रात विदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे प्रमाण कमी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी देखील 12 एप्रिल रोजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या प्रशासनाच्या विरोधात मॅसाच्युसेट्सच्या फेडरल डिस्ट्रिक्ट कोर्टात खटला दाखल केला आहे. प्राध्यापकांच्या दोन गटांनी विद्यापीठाचा निधी रोखण्याच्या धमकीच्या विरोधात ही याचिका दाखल केली होती. त्यादरम्यान ट्रम्प प्रशासन हार्वर्ड विद्यापीठाला मिळणाऱ्या 9 अब्ज डॉलर्सच्या निधीची समीक्षा करत होते.

ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या राज्यघटनेच्या फर्स्ट अमेंडमेंटचे उल्लंघन करतो. विद्यापीठ निधीत कपात करणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे उल्लंघन असल्याचा युक्तिवाद प्राध्यापकांकडून करण्यात आला आहे. न्यायालयात याचिका दाखल करत ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हार्वर्ड विद्यापीठावरील आरोप

अलिकडेच ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला एक पत्र पाठविले होते, या पत्रात विद्यापीठाला काही अटी पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. तसेच असे न केल्यास विद्यापीठाचा संघीय निधी रोखण्याचा इशारा देण्यात आला होता. हार्वर्डसारख्या प्रतिष्ठित संस्था अँटी-सेमिटिज्म (ज्यूविरोधी द्वेष) रोखण्यास अपयशी ठरल्या आहेत. विद्यापीठ परिसरात ज्यू विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या विरोधात भेदभाव होत असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे. तर विद्यापीठाचा मिळणारा निधी संशोधन, शिष्यवृत्ती आणि अनेक वैज्ञानिक आणि वैद्यकीय प्रकल्पांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

विद्यापीठात फडकला पॅलेस्टिनी ध्वज

गाझामध्ये सुरू असलेल्या इस्रायल-हमास युद्धाच्या विरोधात मागील वर्षी अमेरिकेच्या अनेक विद्यापीठांमध्ये पॅलेस्टाइनच्या समर्थनार्थ निदर्शने झाली होती. या निदर्शनांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. याप्रकरणी 1 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. तर निदर्शनांदरम्यान हार्वर्ड विद्यापीठात निदर्शकांनी पॅलेस्टिनी ध्वज फडकविला होता. विद्यापीठाने या कृतीला धोरणाच्या विरोधात ठरवत विद्यार्थ्यांच्या विरोधात कारवाई करणार असल्याचे म्हटले होते.

Advertisement
Next Article