For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

18 कोटींच्या हरवळे धबधबा प्रकल्पावर प्रश्नचिन्ह; जमीन हस्तांतरणाच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी

07:17 PM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
18 कोटींच्या हरवळे धबधबा प्रकल्पावर प्रश्नचिन्ह  जमीन हस्तांतरणाच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी
Advertisement
साखळी | प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेअंतर्गत साखळी येथील प्रसिद्ध हरवळे धबधब्याच्या सुशोभीकरण आणि विकासासाठी मंजूर झालेल्या 18 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पावरून वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पात प्रशासकीय अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप ॲड. अतिश मांद्रेकर यांनी केला असून, याप्रकरणी त्यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. प्रकल्पातील जमीन हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र आणि विविध परवानग्यांबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

देवस्थानच्या जमिनीच्या हस्तांतरणावर आक्षेप

ॲड. मांद्रेकर यांच्या आरोपानुसार, श्री रुद्रेश्वर देवस्थानच्या राज्य सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकाने आणि तात्पुरत्या  समितीने आपल्या अधिकारांचा गैरवापर करून देवस्थानची जमीन हस्तांतरित करण्यासंबंधी कार्यवाही केली. मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्रमांक 391\2017 अंतर्गत संबंधित समितीची नियुक्ती केवळ दैनंदिन कारभार पाहण्यासाठी करण्यात आली होती, असा दावा त्यांनी केला आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत समितीने कायमस्वरूपी आणि रद्द न करता येणारे ना हरकत प्रमाणपत्र (Irrevocable NOC) दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. गोव्यातील देवस्थान व्यवस्थापनाशी संबंधित ‘Regulamento das Mazanias’ नियमांनुसार, महाजनांच्या परवानगीशिवाय देवस्थानच्या मालमत्तेबाबत निर्णय घेण्याच्या अधिकारावरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. ही बाब नाईक भंडारी समाजाच्या महाजनांच्या अधिकारांशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जमीन मालकी आणि प्रतिज्ञापत्राबाबत प्रश्न

सरकारी फॉर्म I आणि XIV मधील नोंदीनुसार, सर्व्हे क्रमांक 67/0 आणि 69/3 येथील जमीन श्री देव महादेव रुद्रेश्वर हरवळे यांच्या नावावर असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. मात्र, गोवा पर्यटन विकास महामंडळाने (GTDC) केंद्र सरकारकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संबंधित जमीन सरकारी असल्याचे नमूद केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Advertisement

जमिनीच्या मालकीसंदर्भातील नोंदी आणि प्रतिज्ञापत्रातील माहिती यांची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

विविध परवानग्यांबाबतही आक्षेप

तक्रारीनुसार, 8 जुलै 2025 रोजी मे. आय.बी. कन्स्ट्रक्शन या कंपनीला कामाचा आदेश देण्यात आला. मात्र, त्यावेळी आवश्यक नगरपालिका बांधकाम परवानगी उपलब्ध नव्हती, असा आरोप मांद्रेकर यांनी केला आहे. तसेच वन विभाग, किनारी नियमन क्षेत्र (CRZ) आणि भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या (ASI) परवानग्या ‘लागू नाहीत’ असे दर्शवण्यात आल्याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

हरवळे परिसरातील नैसर्गिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, संबंधित परवानग्यांची आवश्यकता होती की नाही आणि प्रकल्पाची प्रक्रिया नियमानुसार राबवण्यात आली का, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

निधी स्थगित करून चौकशीची मागणी

या प्रकरणी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडे प्रकल्पाचा निधी तातडीने स्थगित करण्याची आणि कथित अनियमिततांची फौजदारी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जमीन हस्तांतरण, ना हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र आणि बांधकामासंबंधी परवानग्यांच्या प्रक्रियेची स्वतंत्रपणे पडताळणी करण्याची मागणीही तक्रारीत करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.