हर्षवर्धन पाटील यांच्याकडून काका की बाबा चाचपणी! निम्मे बाबांच्या आणि निम्मे काकांच्या बाजूचे !
सांगली प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी भाजपचा खासदार कोण असावा यावरून खासदार संजयकाका पाटील आणि माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यात जोराची रस्सीखेच सुरू असून पक्ष निरीक्षक हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर 120 पैकी 112 प्रतिनिधींनी मत मांडले. यामध्ये निम्मे प्रतिनिधी काकांच्या तर निम्मे प्रतिनिधी बाबांच्या बाजूने राहिले. दुष्काळी फोरमने उमेदवार बदलाचा आग्रह धरून दबाव वाढवला असून दोन नेत्यांच्या वादात पक्षाचे नुकसान होणार असेल तर तिसराच उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
गुरूवारी माजी मंत्री आणि भाजपचे पक्षनिरीक्षक हर्षवर्धन पाटील यांनी सांगली जिल्हा भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोअर टिममधील पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि माजी आमदार विलासराव जगताप वगळता 19 सदस्य उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी दोघांची दूरध्वनीवरून चर्चा केली असता पालकमंत्र्यांनी आपले मत संजयकाकांच्या बाजूने टाकले तर विलासराव जगताप यांनी संजयकाका यांना बदलावे त्याऐवजी पृथ्वीराज देशमुख यांना उमेदवारी द्यावी आणि ही केवळ आपली नव्हे तर जत तालुक्यासह सर्व दुष्काळी तालुक्याच्या भाजप नेत्यांची मागणी असल्याचा दावा केला. त्यामुळे हर्षवर्धन पाटलांनी पक्षाच्या तालुकावार प्रतिनिधींशीही चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार 120 प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले होते. त्यापैकी आठ जण गैरहजर राहिले तर 112 पैकी निम्मे निम्मे दोन्ही बाजूला विभागले गेले. यातही काहींनी संजयकाकांना विरोध असल्याची जोरदार भुमिका घेतली. त्याला निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी मान डोलावल्याचीही पक्षात उघडपणे चर्चा सुरू आहे. भाजपच्या काही प्रतिनधींनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, तुमची भावना काहीही असली तरी या वादात पक्षाचे नुकसान होऊ देऊ नका, अन्यथा पक्षाला काही निर्णय घ्यावे लागतील, असा संदेश दिल्याचे समजते.
विलासराव जगताप यांनी दुष्काळी फोरम विरोधात असल्याची भुमिका जाहीर केली असली तरी आटपाडीचे देशमुख घराणे काकांच्या विरोधात जाण्याची शक्यता कमी आहे. त्यांचे प्रतिनिधी हर्षवर्धन राजेंद्र देशमुख हे बैठकीत होते मात्र त्यांची भुमिका समजली नाही. पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यातून काकांना विरोध झाला तर निम्मा जत, कवठेमहांकाळ, मिरज, सांगली, तासगाव येथून समर्थन करण्यात आले. सांगली, मिरजेतील जुन्या मंडळींनी काकांना विरोध दर्शवला.
सुधीर गाडगीळ पर्यायी उमेदवार?
पक्षातील नेत्यांचे आणि प्रतिनिधींचे जर उमेदवारांच्या बाबतीत एकमत होत नसेल आणि अशा पद्धतीने जर निम्मे निम्मे प्रतिनिधी विभागले जात असतील तर पक्ष त्याचा फटका स्वत: सहन करणार नाही. प्रसंगी मग सर्वांना पक्षाचेच ऐकावे लागेल असा संदेश या बैठकीत देण्यात आल्याचे समजते. त्यानुसार काका आणि बाबा यांच्यापैकी कोणाच्याही एका बाबतीत ठाम निर्णय झाला नाही तर संघ परिवाराला जवळचे असलेले, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचे नाव सर्वसमावेशक उमेदवार म्हणून पक्षात पुढे येण्याची चिन्हे आहेत. पक्षातील प्रमुख मंडळींना याबाबत कल्पना देण्यात आल्याचे समजते.