हर्षवर्धन पाटील वेगळाविचार करण्याच्या मनस्थितीत? बॅनरबाजीमुळे चर्चा रंगली
आकाश पवार भिगवण
भिगवण येथे एक बॅनर लागला तो लावला खरा भाजपा कार्यकर्त्यांनीच (पाटील समर्थक) पण चर्चा होऊ लागली एका वेगळ्या विचाराची, वेगळ्या भूमिकेची. इंदापूर तालुक्याचे प्रवेशद्वार असलेले भिगवन येथील बसस्थानक येथे मागील दोन दिवसांपासून लागलेला हर्षवर्धन पाटलांचा इंदापूर तालुका विकास आघाडी अशा आशयाचा बॅनर हर्षवर्धन पाटील समर्थकांनी ( भाजपा कार्यकत्यांनी) लावल्याने हर्षवर्धन पाटील हे अपक्ष निवडणूक लढू इच्छिता का? असा प्रश्न भिगवन परिसरामध्ये चर्चेला जात आहे. तसेच या बॅनर वर महायुतीतील प्रमुख कोणत्याही नेत्याचा फोटो नसल्याने हा बॅनर अधिकच चर्चेत आला आहे.
सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. एक वर्ष भरापूर्वी अजित पवार हे ४० आमदार घेऊन शरद पवार यांच्यापासून फरकात घेत सत्तेत सहभागी झाले व त्याचबरोबर त्यांचे खंदे समर्थक इंदापूरचे आमदार दत्ता भरणे हे देखील त्यांच्याबरोबर महायुतीत सत्तेत सहभागी झाले. गेल्या पंधरा वर्षापासून भरणे व पाटील यांच्यामध्ये राजकारणात साधा विस्तवही विजला जात नाही व त्यांचा असलेला सत्त्तासंघर्ष हा अख्या राज्याला माहिती आहे. परंतु वरिष्ठ पातळीवरती महायुती झाल्याने महायुतीचा धर्म पाळण्यासाठी दत्ता भरणे व हर्षवर्धन पाटील हे एकत्र आले व सुनेत्रा पवार यांच्या प्रचारामध्ये तालुक्याच्या जनतेला एकत्र दिसू लागले. त्यावेळेस अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता परंतु लोकसभेला शरद पवारांच्या सहानुभूतीच्या लाटेपुढे सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला. इंदापूर तालुक्यातून सुप्रिया सुळेंनी तब्बल २५००० मतांची आघाडी घेतली त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये इंदापूर मध्ये खळबळ उडाली व विधानसभेची उमेदवारी आपल्याला भेटेल का? असा प्रश्न या दोन्ही नेत्यांपुढे उभा राहिला वर वर जरी हे दोन्ही नेते महायुती म्हणुन एकत्रित काम करताना दिसत असले तरी त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र लोकसभेच्या निकालापासून धूसफूस वेळोवेळी दिसून येत होती परंतु भिगवण मध्ये लावलेल्या यंदा गुलाल आपलाच इंदापूर तालुका विकास आघाडी अशी बॅनरबाजी वरून हे उघड होताना दिसत आहे.
ऐन विधानसभेच्या तोंडावर महायुती त इंदापूरची विधानसभेची उमेदवारी ही भाजपचे हर्षवर्धन पाटलांना भेटते का? की चालू विधानसभेचे आमदार दत्ता भरणे असल्याने त्यांना ही विधानसभेचे उमेदवारी भेटते याच्यावरून पुढील गणित अवलंबून असणार आहेत. २०१९ ला झालेले विधानसभा निवडणुकीमध्ये धनगर समाजाचे एकमेव आमदार म्हणून दत्ता भरणे हे राष्ट्रवादी मधून विजयी झाले होते. त्यांची उमेदवारी डावलनं म्हणजे धनगर समाजाचे नाराजी वाढवून घेणे हे अजित पवारना फायद्याचे ठरणार नाही , अजित पवारांच्या जातीय समीकरणास उपयुक्त ठरणारी नाही याचा विचारकरून अजित पवार हे भरणेच्या उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्नशील असतील. तसेच सुप्रिया सुळे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये इंदापूर तालुक्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी ऐनवेळी दिलेली मोलाची साथ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे उमेदवार म्हणून आप्पासाहेब जगदाळे यांचे नाव देखील चर्चिले जात आहे.
मध्यंतरी सोनाई समूहाचे प्रवीण माने यांची सुद्धा पवार साहेबांबरोबर भेट आणि चर्चा झाल्याची चर्चा ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात होती. ऐनवेळी शरद पवार काय धक्का तंत्राचा वापर करतात का? हे पाहणं देखील महत्त्वाचे ठरणार आहे का की इंदापूर तालुका विकास आघाडी ही महविकास आघाडी पैकीच एक असू शकते, अशीही संशयास्पद चर्चा इंदापूर तालुक्यात चालू आहे. इंदापूर मध्ये विजयाची हॅटट्रिक होणार की पराभवाची हॅटट्रिक होणार का इंदापूरकर नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. विधानसभेला अजुन २ महीन्याचा कालावधी आहे हे दिवस पुढे जाईल तसे तसे इंदापूर तालुक्यातील निवडणुकीचे चित्र आणखी रंगतदार असेल पण इंदापूर तालुक्यात या विधानसभेला नक्कीच तिरंगी निवडणूक होणार हे स्पष्ट होताना आहे.