भाटघर धरणातून निरा नदीत 3 टीएमसी पाणी सोडा; माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कालवा सल्लागार समितीच्या बैठकीपूर्वी आक्रमक मागणी
निरा नदीपात्र कोरडे पडल्याने नदीकाठच्या गावांमधील नळ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या परिस्थितीत भाटघर धरणातून निरा नदीत 3 टीएमसी पाणी सोडून नदीवरील बंधाऱ्यांचे तीन ढापे अडवावेत, अशी मागणी पाटील यांनी केली आहे. यामुळे फलटण, बारामती, इंदापूर आणि माळशिरस तालुक्यांतील नागरिकांना दिलासा मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले.
निरा डावा कालवा आणि खडकवासला कालव्यातून इंदापूर तालुक्यापासून ‘टेल टू हेड’ पद्धतीने तातडीने आवर्तन सोडण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या पद्धतीने पाणी सोडल्यास कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढण्यास आणि जनावरांसाठी चारा निर्मितीला मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
शेटफळ तलावातून आवर्तन सुरू करण्याची मागणी
शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील तलावात सध्या पाणीसाठा उपलब्ध असतानाही लाभक्षेत्रातील 10 गावांना मागील पाच महिन्यांपासून आवर्तन मिळालेले नसल्याचे पाटील यांनी पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे नागरिक आणि जनावरांची गैरसोय दूर करण्यासाठी या तलावातून तातडीने आवर्तन सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मागण्यांसंदर्भातील पत्र उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्राताई पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, पुणे पाटबंधारे मंडळाचे मुख्य अभियंता संजीव चोपडे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे आणि कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांना पाठवण्यात आले आहे.
कालवा सल्लागार समितीच्या आगामी बैठकीत या प्रश्नांवर निर्णय होण्याची अपेक्षा असून, हर्षवर्धन पाटील स्वतः बैठकीला उपस्थित राहून पाणीप्रश्नाचा पाठपुरावा करणार आहेत. वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शासन या मागण्यांबाबत काय निर्णय घेते, याकडे संबंधित तालुक्यांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
