हर्षित माहिमकरला दुहेरी मुकुटाची संधी
वृत्तसंस्था/ मुंबई
महाराष्ट्र राज्य खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी येथे हर्षित माहिमकरने मुलांच्या 17 वर्षाखालील वयोगटात तसेच पुरुष एकेरीत अंतिम फेरी गाठली. माहिमकरने पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात कर्णीकचा तर मुलांच्या 17 वर्षाखालील गटात सुमीत माडेचा पराभव केला.
पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बिगर मानांकित हर्षित माहिमकरने द्वितीय मानांकित एस. कर्णीकचा 21-13, 21-10 अशा सरळ गेम्समध्ये 34 मिनिटांच्या कालावधीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. 17 वर्षाखालील मुलांच्या वयोगटातील उपांत्य लढतीत हर्षित माहिमकरने सुमित माडेवर 21-16, 21-15 अशी मात करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात सोहम फाटकने टॉप सिडेड टी. मेहंदळेचा 21-11, 21-8 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. तसेच मुलांच्या 17 वर्षाखालील वयोगटात उपांत्य सामन्यात मेहंदळेने यश गुरवचा 9-21, 21-17, 21-15 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात प्रिशा शहाने अनुष्का भिसेचा 21-16, 21-15 तसेच अन्य एका उपांत्य सामन्यात देवानशी शिंदेने श्रावणी पाटीलचा 13-21, 21-17, 21-15 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. मुलींच्या 17 वर्षाखालील वयोगटातील उपांत्य लढतीत चौथ्या मानांकित पी. खुशीने श्रावणीचा 18-21, 21-14, 28-26 तर दुसऱ्या उपांत्य लढतीत प्रिशा शहाने ऋतू किटलेकरचा 21-12, 21-12 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला.