हॉकी प्रो लीगसाठी भारताचे नेतृत्व हरमनप्रीत सिंगकडे
10 फेब्रुवारीपासून ओडिशात होणार स्पर्धा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रमुख डॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंग एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. भारताचे सामने भुवनेश्वर व राऊरकेला येथे होणार असून या वर्षी होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात आहे.
मिडफिल्डर हार्दिक सिंगकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हॉकी इंडियाने गुरुवारी या लीगसाठी 24 सदस्यीय भारतीय खेळाडूंची निवड जाहीर केली. भुवनेश्वरमधील टप्पा 10 फेब्रुवारीला सुरू होऊन 16 फेब्रुवारीस संपेल तर राऊरकेलामधील दुसरा टप्पा 19 फेब्रुवारीस सुरू होऊन 25 फेब्रुवारीस संपेल. भारताच्या लढती आयर्लंड, नेदरलँड्स, स्पेन, ऑस्ट्रेलिया यांच्याशी दोन टप्प्यात मिळून दोनदा होणार आहेत. भारताची मोहीम स्पेनविरुद्ध 10 फेब्रुवारी रोजी सुरू होईल.
लीगसाठी निवडण्यात आलेला संघ अपेक्षेनुसार निवडण्यात आला असून स्ट्रायकर बॉबी धामी व गोलरक्षक पवन यांना मात्र वगळण्यात आले आहे. गेल्या महिन्यात भारताने दक्षिण आफ्रिका दौरा केला होता, त्यात या दोघांचा समावेश होता. पीआर श्रीजेश व कृशन बहादुर पाठक हे गोलरक्षक म्हणून काम पाहतील. ‘आम्ही काळजीपूर्वक समतोल संघाची निवड केली असून त्यात अनुभवी व युवा खेळाडूंना स्थान दिले आहे. सर्वोच्च स्तरावर लढण्यास सज्ज असणारा संघ तयार करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,’ असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन
म्हणाले. ‘अव्वल संघांविरुद्ध आपल्या खेळाडूंची क्षमता व कौशल्य आजमावून पाहण्याची संधी आम्हाला प्रो लीगमधून मिळणार आहे. ही स्पर्धा आमच्यासाठी ऑलिम्पिक व विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. येथील विजेत्याला 2026 मधील एफआयएच विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळणार आहे,’ असेही ते म्हणाले.
प्रो लीगसाठी निवडलेला भारतीय संघ : गोलरक्षक-पीआर श्रीजेश, कृशन बहादुर पाठक. बचावपटू-जर्मनप्रीत सिंग, सुमित, जुगराज सिंग, अमित रोहिदास, हरमनप्रीत सिंग (कर्णधार), वरुण कुमार, संजय, विष्णुकांत सिंग. मध्यफळी-हार्दिक सिंग (उपकर्णधार), विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंग, निलकांता शर्मा, शमशेर सिंग, राजकुमार पाल, रबिंचंद्र सिंग मोइरंगथेम. आघाडी फळी-ललित कुमार उपाध्याय, मनदीप सिंग, गुर्जंत सिंग, सुखजीत सिंग, अभिषेक, आकाशदीप सिंग, अरैजीत सिंग हुंदाल.