हरमनप्रित सिंग, श्रीजेश सर्वोत्तम
वृत्तसंस्था / लॉसेनी(स्वीस)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनतर्फे 2024 च्या हॉकी हंगामात भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंग याची सर्वोत्तम हॉकीपटू म्हणून तसेच भारतीय संघाचा माजी गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याची सर्वोत्तम हॉकी गोलरक्षक म्हणून घोषणा करण्यात आली. ओमान येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 49 व्या हॉकी पुरस्कार वितरण समारंभात हरमनप्रित सिंग आणि श्रीजेश यांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आला.
2024 च्या हॉकी हंगामामध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या सर्वोत्तम पुरस्काराच्या शर्यतीमध्ये भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने नेदरलॅन्डस्च्या जोएप डी मॉल आणि थिएरी ब्रिंकमन तसेच जर्मनीच्या हॅनेस मुलेर इंग्लंडच्या वॉलेस यांना मागे टाकले. 2024 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कर्णधार हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने कास्यपदक मिळविले. या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रित सिंगने सर्वाधिक म्हणजे 10 गोल नोंदविले. हरमनप्रित सिंगने या स्पर्धेत उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत तसेच कास्य पदकासाठी झालेल्या स्पेन विरुद्धच्या सामन्यात गोल करुन आपल्या संघाला सलग दुसऱ्यांदा कास्य पदक मिळवून दिले.
भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक तसेच दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेत्या श्रीजेशने आपल्या भक्कम गोरक्षणाच्या जोरावर भारताला कास्यपदक मिळवून देण्यात मोलाची कामगिरी केली. कास्य पदकासाठीच्या लढतीत भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. भारतीय हॉकी संघाने टोकियो व त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाठोपाठ कास्य पदके मिळविली. आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या सर्वोत्तम गोलरक्षकाच्या शर्यतीमध्ये पी. आर. श्रीजेशला नेदरलँडचा गोलरक्षक पिमेन ब्लेक तसेच स्पेनचा कॅलेझेडो, जर्मनीचा डॅनेबर्ग आणि अर्जेटिनाचा सॅन्टीयागो यांना मागे टाकले. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर 41 वर्षीय पी. आर. श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला. पी. आर. श्रीजेशने यापूर्वी म्हणजेच 2020-21, 2021-22 साली आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दोनवेळा मिळविला होता.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2024 च्या हॉकी हंगामात नेदरलॅन्डस्ची महिला हॉकीपटू ईबी जेनसेन हिची सर्वोत्तम महिला हॉकीपटू म्हणून तसेच चीनची महिला गोलरक्षक यई जीयाओ हिची सर्वोत्तम गोलरक्षक म्हणून निवड करण्यात आली. ऑस्ट्रेलियाचे हॉकी पंच स्टिव्ह रॉजर्स यांची सर्वोत्तम पुरुष हॉकीपंच म्हणून तर स्कॉटलंडची सारा विल्सनची सर्वोत्तम महिला हॉकीपंच म्हणून निवड करण्यात आली.