हरमनप्रीत नवव्या तर स्मृती चौथ्या स्थानी
आयसीसीकडून महिलांची वनडे क्रमवारी जाहीर
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीतर्फे मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या महिलांच्या वनडे मानांकन यादीत भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संयुक्त नववे स्थान मिळविले असून स्मृती मानधनाने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.
अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात हरमनप्रीत कौरची खेळी महत्त्वाची ठरल्याने भारतीय महिला संघाला ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकता आली होती. या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात कौरची फलंदाजी चांगली झाली नसल्याने तिचे फलंदाजांच्या मानांकनातील स्थान 3 अंकांनी घसरले होते. पण शेवटच्या सामन्यात तिने 63 चेंडूत नाबाद 59 धावा जमवित आपल्या संघाला विजय मिळवून दिल्याने तिने आयसीसीच्या फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान मिळविले.
भारतीय संघातील सलामीची डावखुरी फलंदाज स्मृती मानधनाने न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात शतकी खेळी केल्याने तिला 23 मानांकन गुण मिळाले. तिने आता एकूण 728 मनांकन गुण मिळविले असून ती आता लंकेच्या आघाडीवर असलेल्या चमारी अटापटूपेक्षा केवळ 5 गुणांनी पिछाडीवर आहे. स्मृती मानधनाने महिलांच्या वनडे फलंदाजांच्या ताज्या मानांकनात आपले चौथे स्थान कायम राखले आहे. या यादीत इंग्लंडची नाली सिव्हर ब्रंट 760 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारताची फलंदाज यास्तीका भाटीयाचे या यादीतील स्थान 3 अंकांनी वधारले आहे. यास्तीका आता 45 व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात तिने 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. न्यूझीलंडची ब्रुक हॅलिडे 24 व्या स्थानावर असून जॉर्जिया प्लिमर 74 व्या स्थानावर आहे.
वनडे महिला गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची अनुभवी फिरकी गोलंदाज दीप्ती शर्माने 703 मानांकन गुणासह आपले दुसरे स्थान अधिक भक्कम केले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तिला 16 मानांकन गुण मिळाले. या यादीत इंग्लंडची डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी इक्लेस्टोन 770 मानांकन गुणासह पहिल्या स्थानावर आहे. भारताची वेगवान गोलंदाज रेणुकासिंग ठाकुर 32 व्या स्थानावर असून नवोदित सायमा ठाकुर संयुक्त 77 व्या स्थानावर तर प्रिया मिश्रा 83 व्या स्थानावर आहे. आयसीसी महिला संघांच्या चॅम्पियनशीप मानांकन यादीत भारताने 25 गुणांसह तिसरे स्थान मिळविले असून न्यूझीलंड 21 गुणासह सहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड प्रत्येकी 28 गुणासह संयुक्त आघाडीवर आहेत.