हरेकृष्ण रथयात्रा महोत्सवाची सांगता
विविध कार्यक्रमांची रेलचेल : महाप्रसादाचे वितरण : विश्व शांतीसाठी महायज्ञात 200 दाम्पत्यांचा सहभाग
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनतर्फे 27 व्या हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाची रविवारी सांगता झाली. दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रम झाले. सकाळी मॉरिशसचे सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले. यामध्ये त्यांनी रथयात्रा हे भक्त आणि भगवंत यांच्यामधील आदानप्रदान दर्शविते. भक्त ज्या प्रेम भावनेने रथाची दोरी ओढतात, तितक्याच तीव्रतेने भगवंत प्रतिसाद देतो व भक्तांवर कृपा करण्यासाठी धावत येतो. सामान्यत: दोरी बंधनाचे प्रतीक आहे. परंतु ही रथाची दोरी भाविकांना भौतिक बंधनातून मुक्त करण्यास मदत करते, असेही ते म्हणाले. पहाटे साडेचार वाजता मंगळारती, तुळशी आरती, नृसिंह आरती, नामजप, गुरु आरती करण्यात आली. त्यानंतर भजन, कीर्तन, प्रवचन, नाट्यालिला आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
रविवारी सकाळी इस्कॉनचे वृंदावन प्रभू यांचे प्रवचन झाले. ते म्हणाले, इस्कॉनचे संस्थापक श्री प्रभुपाद यांनी पाश्चात्य देशांमध्ये इस्कॉनचा प्रचार तीन माध्यमांतून प्रचार केला. यामध्ये रथयात्रा, ग्रंथ वितरण यांचा समावेश आहे. पहिली रथयात्रा 1967 मध्ये सॅनफ्रान्सिस्को येथे सुरू झाली, असेही त्यांनी सांगितले. सायंकाळी इस्कॉनच्या गुरुकुल विद्यार्थ्यांची संस्कृतमधून नाट्यालिला सादर झाली. यालाही उपस्थितांची दाद मिळाली. वडगाव येथील भरतनाट्याम शाळेच्या विद्यार्थ्यांनी तीन भरतनाट्यो सादर केली. रात्री भक्तीरसामृत स्वामी महाराज यांचे प्रवचन झाले. त्यानंतर विष्णूप्रसाद आणि सहकाऱ्यांनी अध्यात्मावर मार्गदर्शन केले. रविवारी दिवसभर दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी भक्तांची गर्दी झाली होती. शहरासह ग्रामीण आणि निपाणी, खानापूर, पुणे, मुंबई, कोल्हापूर येथून भक्त दाखल झाले होते.