नरकासुराच्या नावाने पहाटेपर्यंत धांगडधिंगा
कर्णकर्कश आवाजाने रुग्णांना,वयोवृध्द्धांना त्रास : पोलिसांची बघ्याची भूमिका,उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तीनतेरा
पणजी : नरकासुर वधाच्या रात्री नरकासुर करणाऱ्या अनेक मंडळांनी पहाटेपर्यंत कर्णकर्कश ध्वनिक्षेपक लावून नियमांचे उल्लंघन केल्याच्या राज्यभरात अनेक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी पोलिसांनी पथकांना बजावले आणि अखेर कारवाई केली. मात्र काही ठिकाणी पोलिस कान व आपले फोन बंद करून मुकाट झोपल्याने अनेक वयोवृद्ध, आजारी आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागले. त्यामुळे लोकांनी पोलिसांच्या हलगर्जीपणाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल नाराजी तसेच संताप व्यक्त केला आहे.
दरवर्षी नियमांचे उल्लंघन
दर वर्षी नरकासुर करणाऱ्या तसेच नरकासुर स्पर्धा आयोजित करणाऱ्या पथकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना पोलिस अधिकारी सूचना देतात, मात्र दरवर्षी त्याच प्रकारची पुनरावृत्ती होत असते. त्यामुळे हा सगळा नाममात्र प्रकार असल्याचे दिसून येते. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पथकांवर कोणतीही ठोस आणि कडक कारवाई होत नसल्याने ही पथके न्यायालयाच्या आदेशालाही जुमानत नसल्याचे दिसून आले. पोलिसांच्या बैठकीतील सूचनाही कोणतीच किंमत नाही. कारण ‘रात गयी तो बात गयी’ असाच प्रकार दरवर्षी होत असल्याने पोलिसांनाही कोणी घाबरत नाही. यात सर्वसामान्य लोकांची गोची होते आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
मळा येथे मंडळांचे प्रतिनिधी आणि पोलिसांत तणाव
पणजी मळा येथे एका पथकाने रात्रभर कर्णकर्कश ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) लावल्याने पणजी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करताना अगोदर समज दिला आणि लाऊडस्पीकर बंद करण्यास सांगितले. मात्र पोलिस समज देऊन गेल्यानंतर पुन्हा लाऊडस्पीकर सुऊ केला जात होता. अखेर पहाटे पोलिसांनी कारवाई करीत ध्वनियंत्रणा ताब्यात घेतली. त्यावेळी पोलिस आणि मंडळाच्या प्रतिनिधींमध्ये तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी ध्वनियंत्रणा ताब्यात घेतली.
सांखळी-विठ्ठलापूर येथे पहाटेपर्यंत धिंगाणा
सांखळी-विठ्ठलापूर येथे रात्रभर म्हणजे पहाटेपर्यंत ध्वनिक्षेपक सुरु ठेऊन धिंगाणा घालीत राहिल्याने सामान्य लोकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. याबाबत पोलिस महासंचालक, पोलिस महानिरीक्षक, उत्तर गोवा पोलिस अधीक्षक तसेच डिचोली उपविभागीय अधिकारी व निरीक्षक या सर्वांना याबाबत माहिती देण्यासाठी तेथील स्थानिक फोन करण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र कुणीही प्रतिसाद देत नसल्याचे दिसून आले. रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटेपर्यंत जवळजवळ राज्यभर असाच प्रकार सुरु होता. पोलिस केवळ बघ्याची भूमिका बजावत होते. त्यामुळे पोलिस नक्की कुणासाठी काम करतात, कायदा आणि नियम पाळणाऱ्यांसाठी की कायद्याचे उल्लंघन करून सर्वसामान्य लोकांना त्रास देणाऱ्यांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांखळी-विठ्ठलापूर येथे ज्या ठिकाणी मंडप घालण्यात आला होता त्या ठिकाणी जवळपास अनेक घरे असून त्यात काही आजारी, वयोवृद्ध लोक तसेच ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांना रात्रभर मनस्ताप सहन करावा लागला. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता कान बंद करून गप्प राहिले. पोलिसांच्या या असंवेदनशीलता प्रकाराबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याचा तयारीत तेथील काही लोक आहेत.
उच्च न्यायालयाचा आदेश केवळ कागदोपत्री
राज्यात रात्री 10 नंतर ध्वनियंत्रणा सुऊ ठेवणे गुन्हा असून या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावण्यात येणार असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने जारी केला आहे. यात काही सणांच्या दिवसांसाठी रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक सुरु ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात नरकचतुर्दशीच्या रात्रीचा सहभाग आहे. रविवारी याच रात्री 12 नंतरही म्हणजे पहाटेपर्यंत कर्णकर्कश ध्वनियंत्रणा सुरु ठेवून तसेच मोठमोठ्याने आवाज करून एक प्रकारे धिंगाणा घातला जात होता. संबंधितांवर पोलिसांनीही कोणतीच कारवाई केली नसल्याने एक प्रकारे उच्च न्यायालयाच्या आदेशाचे तीनतेरा वाजविण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचा आदेश केवळ कागदोपत्रीच राहिला असून नियमांचे उल्लंघन करणे सुरुच होते.