हर के आगे जीत है!
कालची दुपार फार महत्त्वाची होती. भले त्या उन्हात अंगाच्या लाह्या लाह्या झाल्या तरी चालले, पण आफ्रिकाच जिंकू दे, असे देवाकडे करुणा करणाऱ्या तमाम भारतीयांचं मात्र परमेश्वराने ऐकलं. अर्थात त्याला तुम्ही आपली अगतिकता म्हणा किंवा मजबुरी. ‘अब तेरा क्या होगा इंडिया’ असाच तो सामना होता. ‘डर के आगे जीत है’ असे म्हटले जाते. भारतासाठी असलेला ‘डर’ हा आफ्रिकेने दूर केला. प्रथम आफ्रिकेने मोहीम फत्ते केली. काळाचा महिमा तरी बघा कसा, दोन दिवसापूर्वी आफ्रिका हरावी म्हणून आपण देव पाण्यात ठेवले होते. आणि काल ते जिंकावे म्हणून देवाकडे विनवण्या करत होतो. संघ एकच, पाठीराखेही एकच परंतु त्यांच्याकडून निकाल मात्र वेगवेगळे अपेक्षित होते. असो. संध्याकाळी झिम्बाब्वेचा पराभव करत ‘कौन बनेगा करोडपती’ मधील ‘त्या‘ दहाव्या प्रश्नापर्यंत आपण येऊन पोहोचलोय.
ही स्पर्धा सुरु होण्याअगोदर भारतीय संघ मैदानावर वाघ म्हणून वावरत होता. परंतु सुपर एटमधील पहिल्या सामन्यात तो कागदी वाघ बनला. साखळीतील पहिल्या चार सामन्यात थ्री स्टार हॉटेलमध्ये मौजमजा करणारा भारतीय संघ सुपर एटमधील पहिल्या पराभवामुळे रेस्टॉरंटमधील मेन्यूही महाग झाला. तो मेन्यू कार्ड डाव्या बाजूला नाही तर उजव्या बाजूला बघू लागला. आपल्या क्षमतेला न्याय मिळवून देणारा विजय आपण मिळवला नव्हता. परंतु कालचा विजय हा मागील सर्व गोष्टीवर कडी करणारा होता.
भारतीय संघनायकाने उजवी-डावी जोडी पाठवत ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणत संघाला खऱ्या अर्थाने रिफ्रेश केलं. पहिल्या चार सामन्यात धावांचा अभिषेक न करणारा अभिषेक आज खराखुरा बहरला. त्याच्यावर शेवटपर्यंत दाखवलेला विश्वास त्याने सार्थ केला. आपले सलामीवीर खऱ्या अर्थाने अरबी घोड्यासारखे वावरत होते. कोणालाही खिशात हात घालावे आणि त्यांच्यावर पैसे लावावेत, अशी त्यांनी फलंदाजी केली. त्याला छान साथ दिली ती सूर्या, हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांने. मला एक आश्चर्य वाटलं की सिकंदर रझाने मंदगती गोलंदाजांना सुरुवातीला का नाही आणले? ज्यावेळी त्यांना पाचारण करण्यात आलं, त्यावेळी ते कदाचित फिरकीच्या जाळ्यात फसतील असं वाटलं होतं. परंतु आज भारतीय फलंदाज पूर्ण होमवर्क करून आले होते. भले तो स्लोवर वन असो किंवा ऑफब्रेक. कालपरवा आक्रमणातील सुधारित आवृत्ती आणणाऱ्या विंडीजची कॉपी न करता आक्रमणात नीटनेटकेपणा कसा असावा, हे काल भारतीय फलंदाजांनी दाखवून दिलं. एखाद्या मालगाडीला मागे टाकत जशी सुपर एक्सप्रेस पुढे जाते, अगदी तसेच भारतीय फलंदाजांनी झिंबाब्वेच्या गोलंदाजांना मागे टाकले. कुठल्याही आक्रमकतेला ही शिस्त असते. त्या आक्रमकतेतील शिस्तीचा परिपाठ काल भारतीय फलंदाजांनी घालून दिला.
आपण नेहमी बेंच स्ट्रेंथच्या गप्पा मारतो. तरी आपला ऐनवेळी पराभव का होतो, यातून आपण काही शिकणार आहो की नाही, याचा उहापोह या सामन्या अगोदर बरेच क्रिकेट विश्लेषक करत होते. अर्थात या सामन्यातून भारताने याचा बोध घेतला असावा असेच आपल्याला म्हणावं लागेल.
250 धावाचा पाठलाग करताना पॉवरप्लेमध्ये आपल्या गोलंदाजांनी काम फत्ते केले. भले त्यांनी विकेट घेतल्या नसतील परंतु ‘रन रोको’ आंदोलनात ते यशस्वी झाले. थोडक्यात, काल दुपारी विंडीजवरील आफ्रिकेचा दणदणीत विजय आणि संध्याकाळी भारताचा झिंबाब्वेवरचा एकतर्फी विजय, हा कपिलाषष्ठीचा योग तर नव्हता ना? याचं उत्तर येणाऱ्या सामन्यात लपलंय एवढं मात्र खरं!
