हर हर शंभो...
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये भरलेला महाकुंभमेळा आता अंतिम चरणात आहे. कुंभमेळ्यात गंगा, यमुना आणि सरस्वती या पवित्र नद्यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यास विशेष महत्त्व आहे. मागच्या 13 जानेवारीला पौष पौर्णिमेच्या दिवशी पहिले स्नान पार पडले. दुसरे स्नान 14 जानेवारीला मकरसंक्रांतीला, तिसरे स्नान 29 जानेवारीला मौनी अमावस्येच्या दिवशी, चौथे स्नान वसंत पंचमीला, तर पाचवे स्नान 12 फेब्रुवारीला माघी पौर्णिमेच्या दिवशी झाले. आत्तापर्यंत 50 ते 60 कोटी भाविकांनी हा अमृतस्नानाचा महानुभव घेतल्याचे सांगितले. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर कुंभमेळ्याचे अंतिम स्नान पार पडेल. या दिवशी नदीतील पवित्र पाण्यात आंघोळ करून गंगाजलाने शिवलिंगाचे पूजन व अभिषेक केल्याने पुण्य प्राप्त होते, अशी धारणा आहे. ‘हर हर शंभो’च्या गजरात पार पडणाऱ्या या महास्नानाच्या माध्यमातून कुंभमेळ्याचा समारोपही होणार आहे. त्यामुळे महाशिवरात्रीचा हा दिवस अनेकार्थांनी महत्त्वाचा असेल. या अंतिम स्नानासाठी देशाच्या विविध भागांतून भाविक प्रयागराजकडे निघाल्याने अभूतपूर्व गर्दी होण्याची चिन्हे आहेत. हे पाहता महाशिवरात्रीकरिता उत्तर प्रदेशला विशेष व्यवस्था करावी लागेल. मागच्या जवळपास दीडेक महिन्यांपासून सबंध देशातील वातावरण कुंभमय झाल्याचे दिसून आले. लहान, थोर, वृद्ध, महिला यांच्यासह सर्वच वयोगटातील, सर्व स्तरांतील लोक कुंभमेळ्यात एकवटल्याने या सोहळ्यास खऱ्या अर्थाने महाकुंभमेळ्याचे स्वऊप प्राप्त झाले. यादरम्यान चेंगराचेंगरीसारखी दु:खद घटनाही घडली. प्रचंड गर्दीबरोबरच वाहतुकीच्या कोंडीचाही अनेकांना सामना करावा लागला. तथापि, सर्व कठीण प्रसंगांवर जिद्दीने मात करीत कुंभयात्रींनी आपली ही यात्रा अखेर सुफळ आणि संपूर्ण केली. त्याबद्दल सर्व भाविक, यात्री हे कौतुकास आणि अभिनंदनासच पात्र ठरतात. खरे तर यंदाचा कुंभमेळा हा अनेकार्थांनी महत्त्वाचा ठरलेला दिसतो. विविध आखाड्यातील संत महंत, नागा साधू, आखाड्यांच्या विविध पद्धती, वेशभूषा याशिवाय आयआयटी बाबा, ऊद्राक्षांच्या माळा विकणारी मोनालिसा, अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला आधी देऊन नंतर काढण्यात आलेले महामंडलेश्वर पद, मॉडेलिंग करणाऱ्या हर्षा रिछारिया हिने साध्वी होण्याचा धरलेला मार्ग व इतर अनेक कारणांमुळे आणि विक्रमी गर्दीमुळे हा कुंभमेळा अभूतपूर्व तितकाच संस्मरणीय ठरल्याचे दिसून येते. तसा कुंभमेळ्यातील जनसागर पाहता त्याचे व्यवस्थापन करणे, ही जितकी आव्हानात्मक तितकीच अशक्यप्राय बाब होय. मात्र, उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने हे शिवधनुष्य पेलले. नियोजन आणि व्यवस्थापनात काही त्रुटी राहिल्या, हे निश्चित. चेंगराचेंगरीसारखे गालबोट लागले, हेही खरे. तरीही योगी सरकारने कुंभमेळा पार पाडण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले, हे नाकारता येणार नाही. अर्थात प्रत्येक सोहळ्यातून काहीतरी शिकायचे असते. हा कुंभमेळाही भारतवर्षासाठी बरेच काही शिकवणारा असू शकेल. आगामी कुंभमेळा महाराष्ट्रातील नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणार आहे. दोन वर्षांनी म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी आतापासूनच तयारी करणे क्रमप्राप्त असेल. जिल्हाधिकारी तसेच महापालिकेकडून या कुंभमेळ्याकरिता 6 हजार 900 कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येते. दर बारा वर्षांनी होणाऱ्या या कुंभमेळ्यामुळे नाशिक शहराच्या विकासाला आणखी गती प्राप्त होऊ शकेल. या सोहळ्यालाही पाच लाख साधू, महंतांसह करोडोच्या संख्येने भाविक येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. हे बघता करोडोंच्या या गर्दीला सामावून घेण्याकरिता आतापासून महाराष्ट्र सरकारला सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा लागेल. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्याने यूपीच्या अर्थकारणालाही चांगली गती मिळाली. त्याचबरोबर अनेकांना रोजगार मिळवून देण्यासाठीही कुंभ साह्याभूत ठरल्याचे सांगण्यात येते. हे पाहता नाशिक, त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळाही नाशिक पट्ट्यासह एकूणच महाराष्ट्राच्या अर्थकारणाकरिता महत्त्वपूर्ण ठरू शकतो. खरे तर कुंभमेळा हा साधू, संतांचा, जनसामान्यांसह सर्वांचा धार्मिक उत्सव आहे. त्यामुळे यामध्ये कुणीही कुठलेही राजकारण आणता कामा नये. सत्ताधारी पक्षानेही या कामी विरोधी पक्षीयांचे सहकार्य घ्यावे. तर विरोधकांनीही उलटसुलट विधान न करता साहचर्याची भूमिका कशी घेता येईल, हे पहायला हवे. काही दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्यासंदर्भात काही बाही वक्तव्य केल्याचे समोर आले होते. कुंभमेळा अर्थपूर्ण आहे निरर्थक आहे, हे लालू प्रसाद यांच्यासारख्या नेत्यांनी कुणाला सांगण्याची गरज नाही. प्रत्येक जण कुंभमेळ्यामागचे मर्म जाणून घेण्यास समर्थ आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लालू प्रसाद यादव तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना याबद्दल सुनावले ते बरे झाले. खरे तर धर्म ही वैयक्तिक बाब आहे. धर्माचे पालन कुणी कसे करायचे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये कुणीही लूडबूड करण्याचे कारण नाही. मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन स्वतंत्र बाबी आहेत. श्रद्धेचा आदर करणे आणि अंधश्रद्धेला विरोध करणे, हीच आपली संत परंपरा राहिली आहे. आजवर अनेक संतांनी भक्तीचा जागर करताना अंधश्रद्धेवर कठोर प्रहार केले आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील संत परंपरा यामध्ये आघाडीवर राहिली आहे. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्म परिषदेत खऱ्या अर्थाने जगाला हिंदू धर्म काय आहे, हिंदुत्व कशाला म्हणतात, हिंदू धर्माचे मर्म काय, हे सांगितले. त्यामुळे डाव्या उजव्यांनी संघर्ष टाळून हा खरा धर्म समजून उमजून घेऊन प्रगल्भतेने पुढे गेले पाहिजे. आज देशभर महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होईल. बारा ज्योतिर्लिंगासह देशाच्या कानाकोपऱ्यात हर हर महादेव, हर हर शंभोचा गजर घुमेल. भगवान शंकर हे शक्तीचे आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. भोळा शंकर म्हणूनही महादेवाचे वर्णन केले जाते. देवांचा देव असलेल्या या महादेवाने सर्वांना ताकद द्यावी, शक्ती द्यावी आणि सत्कर्म करण्याची बुद्धी द्यावी, हीच महादेवाचरणी प्रार्थना.