For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोनोलीत घुमला हर हर महादेवाचा गजर!

10:08 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोनोलीत घुमला हर हर महादेवाचा गजर
Advertisement

ब्रह्मलिंग मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उत्साहात प्रारंभ : मूर्ती अन् कलश मिरवणुकीला भाविकांची अलोट गर्दी

Advertisement

वार्ताहर /किणये

सोनोली गावातील जागृत ब्रह्मलिंग मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला गुरुवारपासून मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरुवात करण्यात आली. त्यानिमित्त चार दिवस गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी बेळगुंदी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर येथून ब्रह्मलिंग पिंडी व कळस मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत टाळ मृदंग व ढोल ताशांच्या गजरात भाविक दंग झाले होते. सर्वत्र हर हर महादेवाचा जयघोष सुरू झाला. वारकरी व महिला हर हर महादेव, ओम नम: शिवाय असा जयघोष  तल्लीन होऊन करताना दिसत होते. मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिरवणूक पूजन शिवशंभो सेंट्रिंग मेस्त्राr या ग्रुपच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर भंडाऱ्याची उधळण करत बेळगुंदी येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. सोनोली राकसकोप रोडवरून ही जल्लोषी मिरवणूक सोनाली गावभर काढण्यात आली मिरवणुकीचे महिला आरती ओवाळून ठिकठिकाणी स्वागत करत होत्या. मिरवणुकीनिमित्त सर्व महिलांनी पारंपरिक तसेच केसरी रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. तरुणांनी विविध रंगाचे कुर्ते परिधान केले होते. यामुळे अवघा सोनोली गाव शिवमय बनला होता. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. ब्रह्मलिंग पिंडी व बसवाण्णाची मूर्ती बागलकोट येथून आणली आहे. सोहळ्याचे सर्व कार्यक्रम मुक्तीमठाचे श्री. श्री. सोम सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.

Advertisement

रविवारी मूर्ती प्रतिष्ठापना

रविवार दि. 11 रोजी सकाळी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. सायंकाळी सातेरी पाटील यांचे प्रवचन होणार आहे. तर बाळू भक्तीकर यांचे कीर्तन निरूपण होणार आहे.

सोमवारी उद्घाटन-महाप्रसाद

दि. 12 रोजी सकाळी परशराम कणगुटकर महाराज सोनोली यांचे कालाकीर्तन होणार आहे. त्यानंतर मंदिराचा उद्घाटन सोहळा होणार आहे. उद्घाटनाच्या  अध्यक्षस्थानी मारुती पाटील राहणार आहेत. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व विधान परिषद सदस्य चनराज हट्टीहोळी आदींच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. लोकार्पण सोहळा सर्वजण गुण्यागोविंदाने साजरा करत आहेत.

आज सर्व देवतांचे पूजन

शुक्रवार दि. 9 रोजी सर्व देवतांचे पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी भजनाचा कार्यक्रम होईल. शनिवार दि. 10 रोजी सकाळी वास्तूशांती, गृहप्रवेश, होमहवन आदी कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी निवृत्ती मुचंडीकर यांचे प्रवचन व त्यानंतर सांगली येथील संतोष सहस्त्रबुद्धे यांचे कीर्तन निरूपण होणार आहे.

Advertisement
Tags :

.