अध्याय पाच सारांश
अध्याय पाचवा
ह्या अध्यायाचे नाव संन्यासयोग असे आहे. भगवंतांनी अर्जुनाला चौथ्या अध्यायात कर्मयोगाची महती सांगितल्यानंतर आत्मज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले. त्यावर अर्जुन म्हणाला, देवा, आत्मज्ञान मिळव असेही सांगताय आणि कर्म कर असेही म्हणताय तेव्हा दोन्हीतलं माझ्यासाठी चांगलं काय आहे ते कृपया सांगा.
त्यावर भगवंत म्हणाले, कर्मयोग आणि कर्मसंन्यास हे दोन्हीही मोक्ष मिळवून देतात पण कर्मयोग संन्यासाहून चांगला आहे. संन्यास म्हणजे कर्मत्याग नव्हे. खऱ्या संन्याशाने रागद्वेष सोडून द्यायचे असतात. संन्यास आणि कर्मयोग आचरणाऱ्यांना सारखेच फळ मिळते आधी कर्मयोगाचे आचरण केल्याशिवाय संन्यास साधत नाही. जो कर्मयोगाचे परिपूर्ण आचरण करतो तो आपोआपच संन्यासी होतो कारण कर्मयोग आचरत असताना कोणताही भेदभाव न करता तो ज्याच्यासाठी जे करणे योग्य असेल ते निरपेक्षतेने करत असल्याने त्याच्या मनातले रागद्वेष केव्हाच गळून पडलेले असतात. ज्याने मनावर ताबा मिळवलेला आहे तोच कर्म करून त्याच्या फळापासून अलिप्त राहू शकतो. आपण कर्ते नाही अशी त्याची खात्री असल्याने हातून होणारे कार्य त्याचे हातपाय परस्परच करत आहेत असे तो समजतो. अर्थात त्याच्या हातून घडणारी कर्मे सात्विकच असतात. सर्व कर्मे देवाला अर्पण करत असल्याने तो स्वस्थ असतो.
आपल्या हातून घडणारे कर्म हे आपल्या प्रारब्धानुसार घडत आहे त्यात देवाचा काहीही सहभाग नाही, तसेच कर्मातून मिळणारे पुण्य किंवा पाप हेही देव स्वत:कडे घेत नाही हेही त्याला माहित असते. ज्यांना मी देह आहे ह्या अज्ञानाने ग्रासले आहे त्यांनाच आत्मस्वरुपाची विस्मृती होऊन संसाराबद्दल मोह वाटत असतो. ज्यांचे अज्ञान संपुष्टात आलेले आहे त्यांना मात्र सर्वत्र परब्रह्माचे अस्तित्व स्पष्ट दिसत असते. त्यामुळे त्यांचे उर्वरित पाप पुण्य नष्ट होऊन त्यांचा पुनर्जन्म टळतो. त्यांना समोर दिसणारे सर्व प्राणीमात्र ईश्वरस्वरूप दिसत असतात, सर्व विश्व ब्रह्मव्याप्त आहे ह्या वचनाचा ते प्रत्यक्ष अनुभव घेत असतात. त्यांचे मन निर्विचार असल्याने, मनासारखे काही घडून आले तर त्यांना आनंद होत नाही किंवा मनाविरुद्ध काही घडले म्हणून खेद वाटत नाही. त्यांची निश्चळ आणि निर्मोही बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर झालेली असते. ते अखंड आत्मसुखाचा अनुभव घेत असल्याने विषयातून मिळणाऱ्या सुखाबद्दल त्यांचे मन् विटलेले असते. विषयोपभोग हे दु:खदायक असल्याची खात्री झालेली असल्याने विवेकी साधक त्यात रमत नाही. काम, क्रोधाचे हल्ले परतवून लावणारा योगी सुखी असतो. त्याच्यातील सत्वगुणाची वाढ झालेली असते. त्यापूर्वी त्याच्या सर्व शंका फिटलेल्या असल्याने तो विश्वाच्या कल्याणासाठी झटत असतो. ब्रह्मनिर्वाण समयी दोन्ही भुवयांच्यामध्ये डोळ्यांची एकाग्रता करून तो प्राण आणि अपान समान करतो. मनाला आवर घातल्याने त्याची इंद्रिये व बुद्धी त्याच्या ताब्यात असते. त्याच्या निर्विचार मनाने इच्छा, भय, क्रोध ह्या सगळ्याचा त्याग केलेला असतो. ईश्वर विश्वाचा चालक असून यज्ञ, तपांचा भोक्ता आहे. ईश्वर सगळ्यांचे भले इच्छिणारा असून आपला जवळचा नातेवाईक आहे हे ज्याच्या मनात बिंबलेले असते त्याचा त्याच्यावर पूर्ण भरवसा असतो.
अध्याय पाचवा सारांश समाप्त.