महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शाळेतला आनंददायी शनिवार

06:17 AM Mar 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार सरकारी शाळांमध्ये दर शनिवारी शाळेमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त इतर उपक्रम आयोजित केले जावेत, जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी आत्मीयता वाढेल. सरकारी आदेशापलीकडे विचार करून शालेय विद्यार्थ्यांचा शनिवार आनंददायी करण्यासाठी शालेय शिक्षक काय करू शकतात?

Advertisement

कोडी सोडवल्यामुळे तार्किक विचार करण्यास वाव मिळतो. गणिती किंवा व्यवहारज्ञान वाढवणारी कोडी सोडवण्याचा एक तास घेता येईल. ज्यामध्ये वर्गामधील प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीला डोके चालवून वेगळे उत्तर देण्यास संधी मिळावी.  अनेक शाळांमध्ये शिक्षक आजही त्यांच्या लाडक्या म्हणजेच तथाकथित हुशार मुला-मुलींनाच प्रश्न विचारतात. कोडी सोडवण्याचा तास घेतल्यास वर्गामध्ये शेवटच्या बाकावरच्या विद्यार्थ्यांनाही उत्तर देण्याची संधी मिळावी, भले ते उत्तर चुकीचे असो.  वेगळा विचार करण्याची संधी सहसा वर्गामध्ये अबोल राहणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा मिळावी. शब्दकोडी (क्रॉसवर्ड) सोडवणे, सुडूकू सोडवणे, क्यूब जुळवणे असे अनेक प्रकार आहेत ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीच्या पलीकडचे शिक्षण घेता येईल.

Advertisement

शालेय शिक्षणामध्ये परीक्षेच्या प्रश्नांना एकच अपेक्षित उत्तर असते. शालेय इतिहास नेहमी एकाच बाजूने शिकवला जातो. त्यामुळे निबंध पत्रलेखनामध्ये स्वतंत्रपणे विचार केला जात नाही. वत्तृत्व स्पर्धेमध्ये तोंडपाठ भाषणांना बक्षीस दिले जाते. त्यामुळे आनंददायी शनिवारी वादविवाद स्पर्धा घ्यावी, ज्यामध्ये वर्गातील दोन मुले एका बाजूने मुद्देसूद बोलतील आणि दुसरी दोन मुले त्याचा विचारपूर्वक प्रतिवाद करतील. कोणता अभिनेता/कोणती अभिनेत्री श्रेष्ठ आहे, महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे आहे की मागे, भारत देशाचे गुण आणि दोष, शेतकरी होण्याचे फायदे आणि तोटे अशा विविध विषयांवर वाद विवाद स्पर्धा आयोजित करता येतील. शिक्षकांची भूमिका ही चर्चा अभ्यासपूर्वक होईल याकडे लक्ष देण्याचीच असेल तसेच मुद्देसूद मांडणी कशी करावी याचे मार्गदर्शन शिक्षक करू शकतात परंतु शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुद्दे सुचवू नयेत. पाठांतराच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे आणि वेगळा विचार करण्यास शनिवारी प्रोत्साहन मिळाल्यास शिक्षणाची अवस्था सुधारण्यास मदत होईल.

शालेय शिक्षणात चित्रकलेच्या तासाला साचेबद्ध चित्रे काढण्यास शिकवले जाते.  त्यामुळे निसर्गचित्र काढताना दोन डोंगरामधून उगवणारा सूर्य आणि आकाशामध्ये चार आकड्याचे चार पक्षी असेच चित्र काढले जाते. शनिवार आनंददायी करताना प्रत्येक मुला-मुलीस एक वेगळी गोष्ट वाचण्यासाठी देऊन त्या गोष्टीवर एक चित्र दहा मिनिटात काढण्याची स्पर्धा घ्यावी. तत्परतेने वेगळा विचार करण्याची संधी या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना मिळू शकते. ओरिगामी शिकणे, वृत्तपत्रातील चित्र-वाचन, उत्तम पेंटिंग बघणे आणि त्यावर चर्चा करणे असे अनेक उपक्रम चित्रकला-हस्तकला वेगळ्या पद्धतीने शिकण्यासाठी राबवता येतील.

विद्यार्थी-विद्यार्थिनी मोबाईलवर संगीत ऐकत असतात. देशी-विदेशी संगीताचे वेगवेगळे प्रकार समजून ऐकणे, चित्रपटातील गाण्यांचे अर्थ समजून घेणे, गीतकार  संगीतकार गायक-गायिका ओळखणे, ‘तारे जमीन पर’, ‘लगान’, ‘दंगल’, ‘कुंग फु पांडा’ सारख्या वेगवेगळ्या चित्रपटातील प्रसंग समजून बघणे, उत्तम चित्रपटांची यादी तयार करणे, उत्तम हिंदी-मराठी-इंग्रजी गाण्यांची यादी करणे अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा कला-अभ्यास करण्याकडे कल वाढू शकतो.  महाराष्ट्राबाहेर अनेक राज्यामध्ये संगीत हा विषय आवर्जून शिकवला जातो त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना स्वर-तालाचे ज्ञान असते. महाराष्ट्र सरकारने अद्याप संगीत हा विषय अनिवार्य केलेला नसल्यामुळे पुढच्या पिढीची संगीत समज वाढण्यासाठी किमान शनिवारचा वापर करता येईल. दिग्गज कलाकार-खेळाडूंवर अनेक डॉक्युमेंटरी लघुपट यु ट्यूबवर उपलब्ध आहेत. पक्षी-प्राणी-झाडांचे वैविध्य दाखवणाऱ्या अनेक डॉक्युमेंटरी यु ट्युबवर उपलब्ध आहेत. त्या दर शनिवारी बघणे हा उपक्रम अभ्यासातील रुची वाढवणारा ठरेल.

स्वयंपाकघरातील विज्ञान सांगणे, चहा करणे, भात लावणे, कणिक भिजवणे,  तेलाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा करणे, पाव-बिस्कीट पुड्यावरील तपशील वाचून ते पदार्थ कसे तयार करतात याबद्दल चर्चा करणे, दहावीनंतर करियरसाठी वेगवेगळे शिक्षण पर्याय कोणते यावर सांगोपांग चर्चा करणे, वेगवेगळ्या करियरचे फायदे तोटे एकमेकाना सांगणे, असे अनेक विषय चर्चेसाठी निवडता येतील.

चांगल्या सवयी, सहकार्याची भावना, नेतृत्वगुण विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्याकरीता शालेय शिक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सरकारची इच्छा आहे. त्यासंबंधी वृत्तपत्रातील बातम्यांची कात्रणे वाचणे, वेगवेगळी साप्ताहिके, मासिके, पुस्तके वाचणे, लेखकांची नावे आणि त्यांनी लिहिलेली विविध पुस्तके याविषयी माहिती घेऊन चर्चा घडवून आणल्यास वाचनाविषयी आस्था निर्माण होईल आणि वाचन करवून घेण्याचा वर्ग घेता येईल. वृत्तपत्रातील बातम्या-लेख-अग्रलेख वाचण्याचा तास नियमितपणे घेतल्यास आठवीच्या विद्यार्थ्यांचा वाचन स्तर पहिली-दुसरीच्या पातळीपासून आठवीपर्यंत आणण्यास मदत होईल.

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्यात यावी असाही उद्देश आनंददायी शनिवारचा आहे. त्यासाठी प्राणायाम, योग, ध्यानधारणा याबरोबरच आर्थिक नियोजन, खेळातून शिक्षण, आरोग्यविषयक सजगता, रस्त्यावरील सुरक्षितता याविषयी चर्चा करण्याबद्दल सरकारी आदेशामध्ये उल्लेख आहे. आर्थिक नियोजन शिक्षक कसे करतात, त्यांना पगार किती मिळतो, त्यामधील किती पैसे ते साठवतात आणि त्यांचा महिन्याचा खर्च किती होतो याबद्दल शिक्षकांनी खुलेपणाने वर्गामध्ये बोलणे आवश्यक आहे. पैसे साठवणे आणि गुंतवणूक करणे, बँकांचे व्याज ठेवींवर किती व कर्जावर किती याबद्दल सविस्तर चर्चा झाल्यास त्याबद्दल मुले-मुली घरी जाऊन त्यांच्या पालकांशी चर्चा करू शकतात. अनेक पालक आपले उत्पन्न आपल्या पाल्यास सांगत नाहीत. दरमहा घरात विकत घेतला जाणाऱ्या किराणा सामानाचा भाव विद्यार्थ्यांना माहित नसतो.  त्याबद्दल चर्चा वर्गामध्ये केल्यास जमा आणि खर्च याचा मेळ कसा घातला जातो याबद्दल मुले विचार करण्यास सुरुवात करतील.

शालेय शिक्षकांना गणवेश असणे बंधनकारक करण्यात आले आहे, ज्याचा शिक्षणाच्या दर्जाशी काहीही संबंध नाही. असे दिखाऊ निर्णय घेणे प्रत्येक सरकारला आवडत असते. शालेय शिक्षकांनी कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे, धोतर नेसले आहे की जीन्स-टी शर्ट घातला आहे, शिक्षिकेने साडी नेसली आहे की पंजाबी ड्रेस यावर शिक्षणाचा दर्जा कमी-जास्त होत नाही किंवा त्यामुळे शिक्षणाविषयी मुलांच्या मनात आस्था निर्माण होणार नाही. क्रमिक पुस्तकांमध्ये कोरी पाने घातल्यामुळे वजन कमी झाले असेल पण असे कोणतेही पाउल उचलल्यामुळे महाराष्ट्रातील मुले भारतातील इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षणात प्रगत होणार अशी कोणतीही शक्यता निर्माण झालेली नाही. त्यामुळे असले धेडगुजरी निर्णय घेण्यापेक्षा ‘घोका आणि ओका’ या शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल करून स्मरणशक्तीवर अवलंबून असणारे शिक्षण देण्यापेक्षा जीवन कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान, वाचन कौशल्य शिकवणारे, नाविन्यपूर्ण उद्योग करण्याचे शिक्षण देणारे निर्णय घ्यावेत. अर्थात असे बदल केल्यामुळे परिणाम दिसण्यासाठी पाच-दहा वर्षे द्यावी लागतील. परंतु तसा विचार करण्यास ना सरकार तयार आहे, ना शिक्षक-पालक. दिखाऊ उपायांपेक्षा शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी शिक्षण व्यवस्थेने प्रयत्न करावेत आणि त्यामध्ये शासनाचा कमीतकमी हस्तक्षेप असावा. असे केले, तरच महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत पुढे जाऊ शकेल.

सुहास किर्लोस्कर

(लेखमाला समाप्त)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article