वाचू आनंदे
घरामधले स्वयंपाकघर एकदा आटोपले की देवघरात जाऊन निवांत बसणाऱ्या आजी, आत्या, काकू एका पिढीने अनुभवल्या आहेत. देवघर म्हणजे जणू त्यांचे कार्यालय होते. लांबलचक पूजा आणि त्यानंतर पोथीवाचन, मन लावून स्तोत्रपठण आणि संतांची चरित्रं लिहिण्या-वाचण्यात दुपार सरत असे. नंतर भोजन. सोवळे पूजेपर्यंत चालत असे. वाचनाचा नेम अखंडित चालवणाऱ्या पूर्वज स्त्रियांची आठवण झाली की मन भरून येते.
घरभर माणसेच माणसे. त्यात पाहुणेरावळे. स्वत:ची मुले आणि आप्तांची, मित्रांची शिकणारी मुले हा संसारगाडा नेटाने चालवत त्या स्त्रिया श्रद्धा, निष्ठा जोपासून नित्य वाचन कसे काय बरे करीत असत? ते त्यांच्या जगण्याचे बळ होते. वाचनसंस्कारातून मनन, पुढे चिंतन आणि त्यातून आचरण घडते. सहज उपलब्ध नसणारी पुस्तके, पोथ्या आणि घरात रोज येणारे परंतु हाती लागेलच याची शाश्वती नसलेले वर्तमानपत्र वाचण्यासाठी त्यांची धडपड चालत असे. स्वत:साठी वेळ काढून वाचनात रमणाऱ्या स्त्रियांना एक नमस्कार रोज घालावा. यापलीकडे दुसरे काय?
इंग्रज सरकारने सरकारी नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांना केसरी हे लोकमान्य टिळकांचे वर्तमानपत्र घेण्यास बंदी केली होती, तेव्हा घरातील स्त्रिया धाडसाने म्हणाल्या, आमचे पती सरकारी नोकर आहेत. आम्ही कुणालाही बांधील नाही. आम्ही केसरी घेणार, वाचणार आणि लोकमान्य टिळकांच्या पाठीशी उभे राहून स्वराज्यासाठी लढणार. त्यावर त्यांच्या ओव्या उपलब्ध आहेत.
‘स्वदेशाचा मंत्र लोकमान्य देती, मिळेल मुक्ती हिंदुस्थाना?’
-लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली तेव्हा बायकांच्या मनावर दु:खछाया पसरली. परंतु ते जेव्हा सुटून आले तेव्हा सरकारने वर्दी न देता त्यांना वाड्यापाशी आणून सोडले.
‘टिळक सुटले रात्रीचे साडेबारा
देशोदेशी गेल्या तारा देशभक्तां’
-अशी एक ओवी आहे. रोज सकाळी उठल्यावर परमेश्वराला हात जोडून स्त्रियांनी प्रार्थना केली.
‘पहिली माझी ओवी जगाच्या पालका
रक्षोत टिळकबालका रात्रंदिवस’
-कष्टाचा डोंगर उपसणाऱ्या स्त्रिया
देशभक्ती लिहून-वाचून घरात रुजवत होत्या.
समर्थ रामदास स्वामींच्या अधिकारी शिष्या वेणाबाई यांचे चरित्र अंतर्मुख करीत मनामनांना प्रेरणा देणारे आहे. वेणाबाई या समर्थांच्या लाडक्या आणि पट्टशिष्या होत्या. सद्गुरुचरण सेवा, सद्गुरु चिंतनात देह झिजवून स्वत: तरुन जात त्या इतरांना तारक झाल्या.
कोल्हापूरात त्यांचे बालपण गेले. बालपणापासूनच त्या विरक्त, शांत आणि योगी होत्या. अष्टवर्षाभवेत् काळाप्रमाणे त्यांचे लग्न झाले पण त्या बालविधवा झाल्या. आधीच प्रपंचात मन नव्हते, त्यात संसार मांडण्यापूर्वीच मोडला. सौभाग्य हे की आई-वडिलांनी लिहायला, वाचायला शिकवले होते. बालपणीच पोथ्यापुस्तकांचे वेड त्यांना लागले होते. नंतर ते वाढले. श्रीमद् भगवद्गीता, भागवत या ग्रंथांवाचून त्या क्षणभरही विसंबत नसत.
भक्ती, ज्ञान, वैराग्याचे शिक्षण देणारा श्री एकनाथ महाराजांचा भागवत ग्रंथ तर त्यांच्या विशेष आवडीचा होता. त्याची असंख्य पारायणे त्यांनी केली. समर्थ रामदास स्वामी वेणाबाईंच्या सासरी मिरजेस गेले असता त्यांना असे दिसले की वाड्यातल्या पुढच्या चौकात वृंदावनापाशी वेणाबाई भागवत ग्रंथ वाचत बसल्या आहेत. समर्थांनी वेणाबाईंना विचारले, ‘मुली तू कोणता ग्रंथ वाचतेस? त्यात काय सांगितले आहे? या ग्रंथवाचनाचा तुला काही प्रत्यय आला आहे का?’ तेव्हा वेणाबाई म्हणाल्या, ‘भक्तिभावाने ग्रंथ वाचावा एवढेच मला कळते. त्यातील ज्ञान मला कुठून असणार?’ विनम्रतेने उत्तर देणाऱ्या वेणाबाईंनी समर्थांना 25 प्रश्न विचारले. ते प्रश्न एका अभंगात बांधून त्यांच्या उत्तरांचा दुसरा अभंग रचून समर्थांनी दोन अभंग वेणाबाईंना दिले. समर्थांना ठाऊक होते की नुसते वाचन हे यांत्रिक होते. त्यात भक्ती, भाव ओतला की ज्ञानाचे स्फुरण होते आणि मनात प्रश्नांची गर्दी होते. हे व्यासंगाशिवाय शक्य नाही. समर्थांनी आपल्या शिष्येचा अधिकार ओळखला. निरंतर चरणसेवा आणि गुरूंचा सहवासही मिळावा ही प्रार्थना वेणाबाईंनी करताच समर्थ म्हणाले, ‘अजून ती वेळ यायची आहे’. मनाचे श्लोक, अभंग, पदे यांचे निरंतर वाचन आणि एकांतात मनन करण्यास सांगून समर्थ निघून गेले.
पुढे वेणाबाई अधिकारानुसार समर्थसेवेत रुजू झाल्या. श्री समर्थांच्या संगतीत असलेल्या शिष्यांना कामे वाटून दिली जात असत. त्यानुसार रोजच्या उपाहाराची व्यवस्था वेणाबाईंकडे होती. नेमून दिलेले काम झाल्यानंतर उरलेला पूर्ण वेळ त्या वाचन आणि लेखनात व्यतीत करत. श्रीरामायण, भागवत, गीता यासह साधुसंतांच्या ग्रंथाचे वाचन, मनन त्या करत. थोर समर्थभक्त, संशोधक शंकर श्रीकृष्ण देव म्हणतात की, ‘श्री समर्थ संप्रदायापैकीच नव्हे, तर इतर कोणत्याही एखाद्या श्री शिवकालीन महाराष्ट्र स्त्राrचा ग्रंथ असल्याचे मला ठाऊक नाही. वेणाबाईंचा फक्त स्वतंत्र ग्रंथ आहे.’ वेणाबाईंचे वाड्.मय विपुल प्रमाणात आहे.
स्त्राrमनाचे इंद्रधनु रंग साकारणारा सीतास्वयंवर हा वेणाबाईंचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याचा मानदंड आहे. मातृसुलभ स्त्राrमनाचा भावविष्कार आहे. यात श्रीरामांची मानसपूजा आहे. त्यात वेणाबाई म्हणतात, ‘राम गुणाचा सागरू, राम सुखाचा सुखरू, राम भक्तांचे माहेरू, राम विसावा जनाचा । राम मनाचे मोहन, राम जीवाचे जीवन, राम सदा समाधान, ज्ञानियाचे?’ ‘राम मनाचे मोहन’ असे त्या म्हणतात. पक्वान्न किंवा एखादा विशिष्ट पदार्थ करताना स्त्रिया तो वातड, कडक होऊ नये म्हणून तेलाचे किंवा तुपाचे कडकडीत मोहन घालतात. त्यामुळे तो पदार्थ रुचकर, खुसखुशीत होतो.
वेणाबाईंचा काळ हा स्त्रियांच्या मनाचे पोषण न करता शोषण आणि कुपोषण करणारा होता. अशा काळात स्त्राrचे मन मऊसूत, कोमल, उन्नत राहावे म्हणून ‘राम मनाचे मोहन’ असे वेणाबाई म्हणत असाव्यात. मठपती म्हणून आपल्या अलौकिक कार्याचा ठसा उमटवणाऱ्या वेणाबाई म्हणजे ऊर्ध्व ऊर्जा निर्माण करीत मनावरची मरगळ झटकून टाकणाऱ्या शलाका आहेत. वाचू आनंदे हा संस्कार रुजवणाऱ्या वेणाबाईंचे चरित्र पुन्हा पुन्हा अभ्यासावे असेच आहे.
-स्नेहा शिनखेडे