For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आनंद यात्रा

06:22 AM Jan 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
आनंद यात्रा
Advertisement

डिसेंबरचा शेवटचा आठवडा म्हंटला की अनेक लेख शेवटचे निरवानिरवीचे लिहितात, झाल्यागेल्याचा, चांगल्या वाईटाचा लेखाजोखा मांडतात. कारण आता येणारे नवीन वर्ष नवीन काहीतरी करायला, सृजनाच्या वाटा दाखवणार याची मनोमन खात्रीच पटलेली असते. आमचं जगणं कायमच तुलनात्मक सुरु असतं. मागच्या वर्षी हे असं झालं म्हणून ते तसं करु याप्रमाणे. खरं तर हे जुन्या वर्षाचं विसर्जन आम्ही ज्या उमेदीने स्विकारतो तसे आम्ही आमचे तिसरे प्रहर स्विकारले तर? दचकलात ना! माझे तेच झालं. ते स्विकारत असताना मनातल्या आठवणी अशा काही उधळल्या की त्याचं नेमकं काय करावं कळेना. मुळात आपल्याला काही टाकून देणं, सोडून देणं मान्य नसतंच. त्यामुळेच मनावर, शरीरावर ज्या काही आवरणांच्या झुली साठतात, त्यात गुदमरायला होतं. पण हातून सुटता सुटत नाही. या आठवणी अनेकदा डोळ्याचे काठ चिंब करतात, पण नाहीशा होत नाहीत. त्या सगळ्यात आपल्या चांगल्या आठवणी मात्र कुठेतरी अंग मोडून अवघडून बसलेल्या असतात. त्यांची गाठ पडायला हवी असेल तर मात्र या वरवरच्या कचऱ्याला आवरून टाकून, संपवायला हवंय. खूप कमी लोकांना ही आवराआवर जमते.

Advertisement

माझी आज्जी तिची पैठणी, दागिने, पैसे असेच कुठेतरी तळाशी ठेवायची. मौल्यवान आठवणी टपोऱ्या मोत्यासारख्या, मौल्यवान दागिन्यासारख्या तळाशी जातात. त्या आठवणीचे तळ गाठायची उर्मी या आयुष्यात संध्याकाळी फार तीव्रतेने होते. आयुष्याच्या प्रवाहात हे मनावरचे पोटमाळे रिकामे करायला हवेत, सोडून द्यायला हवेत. म्हणजे मनाचे तळ निरखता येतील. वानप्रस्थाश्रम खरंतर याचसाठी असायचा. वनात जाऊन संसारातून अलिप्त होण्यासाठी, आजकाल घरात राहून हे सगळेच साधण्याचा प्रयत्न केला जातो, जे वनात जाऊन जमत नाही ते घरात राहून कसे काय जमणार? आमचा सगळा जीव आमच्या संसारात, देण्याघेण्यात, अन् कटु आठवणीत अडकलेला असतो. शरीरावरची आणि मनावरची आवरणं, लिप्तता वाढत जाते. निर्लेपाचे अलिप्तपण यायला हवे. ते आलं की काटेसावरीच्या कापसाचा हलकेपणा अनुभवतो. आयुष्यातले सुवर्ण क्षण त्या आनंदात चमचमत असतात, डोलत असतात.

अशी अनुभूती हरिद्वारच्या गंगेच्या काठावर हमखास येत असते. याठिकाणी वावरताना वाटेत कितीतरी आप्तस्वकीय, मैत्री, सुरूद, जीवलग, सखा म्हणून भेटत असतात.

Advertisement

कित्येक जण मध्येच कुठेतरी प्रवाहात गडप होतात, पण गंगेच्या काठावरील दिव्यांना याचं दु:ख करायला वेळ नसतो, पुढे गेलेल्याबद्दल इर्षा नसते, ती फक्त एक आनंद यात्रा असते. कुठल्या तरी निर्जनस्थळी जाणारी यात्रा. या मार्गावर पाऊलखुणा नसतात, कोलाहल नसतो, असते ती फक्त नीरव शांतता. त्याचं गारूड इतकं मोठं असतं की कोणतेच पाश थांबवत नाहीत. अंधाराच्या गर्भगृहात सुरू झालेला हा प्रवास ब्रह्म प्रकाशाच्या यात्रेचा प्रवासी झालेला असतो आणि आजूबाजूच्या शांततेचं मोहून टाकणारे संगीत निशब्दपणे ऐकू यायला लागतं.

Advertisement
Tags :

.