‘मन की बात’मधून होळीच्या शुभेच्छा
व्होकल फॉर लोकल’ला प्राधान्य देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात कार्यक्रमातून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना होळीच्या शुभेच्छा देताना रंगांचा हा उत्सव ‘व्होकल फॉर लोकल’च्या संकल्पाने साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांचेही स्मरण केले. तसेच ‘स्वच्छ भारत’चा संदेश देतानाच ‘डिजिटल क्रांती’चे जोरदार कौतुकही केले.
आपल्या वेगाने पुढे जाणाऱया देशाच्या प्रत्येक कोपऱयात डिजिटल इंडियाची ताकद दिसून येत आहे, असे पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले. तसेच परदेशात भारतीय खेळण्यांची पेझ वाढल्याचेही सांगितले. आपल्या वेगाने वाटचाल करणाऱया देशात डिजिटल इंडियाची ताकद प्रत्येक कोपऱयात दिसत आहे. डिजिटल इंडियाची शक्ती प्रत्येक घरापर्यंत नेण्यात विविध ऍप्सची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे ते म्हणाले. ई-संजीवनी हे देखील असेच एक ऍप आहे. ई-संजीवनी हे देशातील सामान्य माणसांसाठी, मध्यमवर्गीयांसाठी आणि डोंगराळ भागात राहणाऱयांसाठी जीवनरक्षक ऍप बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
युपीआयची ताकद जगाने पाहिली
भारताच्या ‘युपीआय’ची ताकद सर्वांना समजली आहे. जगातील अनेक देश याकडे आकर्षित झाले आहेत. काही दिवसांपूर्वी भारत आणि सिंगापूर दरम्यान युपीआय-पे नाऊ लिंक लाँच करण्यात आली होती. याचा फायदा अनेकांना होणार आहे. आता सिंगापूर आणि भारतातील लोक त्यांच्या मोबाईलवरून त्यांच्या संबंधित देशांत एकमेकांसोबत पैसे ट्रान्सफर करू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
परदेशात भारतीय खेळण्यांची पेझ
यापूर्वी ‘मन की बात’मध्ये आम्ही भारताच्या पारंपारिक खेळांना प्रोत्साहन देण्याबद्दल बोललो होतो. त्यावेळी लगेचच देशात भारतीय खेळांमध्ये सहभागी होण्याची, आनंद घेण्याची आणि शिकण्याची लाट निर्माण झाली. ‘मन की बात’मध्ये भारतीय खेळण्यांचा विषय आला तेव्हा देशातील लोकांनी त्याचा प्रचारही केला. आता भारतीय खेळण्यांची अशी पेझ निर्माण झाली आहे की परदेशातही त्यांची मागणी वाढत आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
‘मन की बात’ हे एक अप्रतिम व्यासपीठ
‘मन की बात’च्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी जोडून मला खूप आनंद होत आहे. शतकाच्या दिशेने या प्रवासात देशवासियांनी लोकसहभागाच्या अभिव्यक्तीसाठी एक अप्रतिम व्यासपीठ बनवले आहे. तुम्हाला तुमच्या मनाची शक्ती माहित आहे, त्याचप्रमाणे समाजाच्या सामर्थ्याने देशाची शक्ती कशी वाढते. हे आपण ‘मन की बात’च्या वेगवेगळय़ा एपिसोडमध्ये पाहिले आणि समजून घेतल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्वच्छ भारत अभियानाचे कौतुक
स्वच्छ भारत अभियानाने आपल्या देशात लोकसहभागाचा अर्थच बदलून टाकल्याचे पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी हरियाणातील एका गावाचे उदाहरण दिले. येथे तरुणांनी स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत भिवानीला मोठे करायचे असे येथील जनतेने ठरवले आहे. युवक पहाटे 4 वाजता तेथे पोहोचतात आणि स्वच्छता मोहिमेला सुरुवात करतात, असेही मोदींनी सांगितले.