महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आली दिवाळी हो...

06:12 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहाटेच जाणवायला लागलेली थंडीची शिरशिरी, संध्याकाळी धुक्यात गुडुप्प होणारं गाव! नुकतीच कापणी करून घराघराच्या दाराअंगणात विसावलेली धान्यलक्ष्मी, शेतशिवारापासून ते थेट डोंगरमाथ्यावर दरवळणारा आणि वेड लावणारा तिचा तो गंध! आताशा तडतडत्या कातडीला मऊशार करण्यासाठी तेल लावून अभ्यंगस्नान करावं असं आतूनच वाटायला लागलेलं असतं नि कडाडून पेटायला लागलेल्या क्षुधाग्नीत खमंग, तुपाळ पौष्टिक पदार्थांच्या आहुती घालाव्याशा वाटायला लागलेल्या असतात. रात्री उशिरापर्यंत जागणाऱ्या आयाबाया कढई, झारे, तुपं तेलं, भाजण्या आणि काजू, बदाम, साखर, गूळ यांच्याशी आट्यापाट्या खेळत असतात आणि मोबाईलवरून

Advertisement

नक्षत्रांचे बांधून तोरण

Advertisement

मनामनांचे करुनी मीलन

दिव्य ज्योत ही आनंदहृदयी

गोविंदे लावली

आली दिवाळी आली दिवाळी

हे गीत आशाताईंच्या स्वर्गीय स्वरात लपेटून कानाशी झरत येतं आणि लक्षात येतं.. अरेच्चा आलीच की दिवाळी...अगदी हलक्या हलक्या पावलाने दाराशी ठाकलीच. वातावरण बदललेलं असतं. कां कोण जाणे पण प्रसन्न वाटत असतं. कर्त्या माणसांची नुसती धांदल गडबड उडालेली असते. खरं म्हणजे दसरा संपला की दिवाळीचे वेध लागतात. मग कुणी रायाच्या लाडाकोडाची

दसरा गेला दिवाळी आता येईल उद्या परवा

अहो राया मला जरतारी शालू आणा

पैठणचा हिरवा

अशी लाडिक स्वरात मागणीही करते. आणि खरंच जर का रायाने मागणी पुरविली तर मग काय विचारता,

झाली बहाल मर्जी सख्याची सख्याची

साडी दिली शंभर रुपयांची..

असं म्हणत नाचत मिरवावंसंच वाटायचं तिला! अहो हे शंभर रुपये सुमारे साठ वर्षांपूर्वीचे आहेत हां! म्हणजे आजच्या दराने किती ते पहावे मोजून. जुन्या सिनेमातील दिवाळी पाहताना खरंच मजा येते. एकत्र कुटुंब, कृष्णधवल पडद्यावर असलेलं आठवणी जागवणारं चित्रीकरण, पाडवा आणि भाऊबीजेच्या ओवाळण्या, सात्त्विक, सोज्ज्वळ पोशाखात शोभून दिसणारी वडीलधारी मंडळी... खरोखरच खूप खूप सुंदर असते चित्रपटातील दिवाळी. या दिवाळीच्या थीमवर ओवाळणी, ओवाळिते भाऊराया, यासारखे कितीतरी संस्मरणीय चित्रपट आहेत. तसंही फिल्म जगत म्हणजे लक्ष्मीचा वरदहस्त असलेलं क्षेत्र आणि दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजन, त्यामुळे हिंदी चित्रपटात दिवाळीसारखी असणारी भव्यदिव्य सजावट, त्यावर केला जाणारा प्रचंड खर्च, हे सगळं ओघानेच येतं. आधुनिक शास्त्राrय संगीतात यमनच्या जवळपास असणारा दीपावली या नावाचा एक स्वतंत्र रागही आहे. संगीत सम्राट तानसेन यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात त्याने दीपकराग आळविल्यावर सर्वत्र उजळत जाणारे दिवे आणि त्याच्या देहात सर्वत्र उठलेला दाह दिवाळी आणि दिव्यांची दाहक बाजूही असते हे दाखवतो. दिवाळीची चाहूल जशी वातावरण, फराळाचे सुवास, उटण्याचा गंध यामुळे लागते तशीच ती दिवाळीच्या गीतांनीही लागत असते. म्हणून तर अष्टविनायक चित्रपटातलं कायमचं प्रसिद्ध असलेलं

आली माझ्या घरी ही दिवाळी

सप्तरंगात न्हाऊन आली

हे गाणं रेडिओवर वाजायला लागलं की दिवाळी आल्याची खरी जाणीव व्हायची. वसुबारसेपासून पणत्या लावायला सुरुवात होते. आणि संध्याकाळी अंगणात बसून त्या दिव्यांचा छोटा प्रकाश वाढत जाणाऱ्या अंधाराच्या पार्श्वभूमीवर फार सुरेख दिसतो. आणि आपोआप गाण्याच्या ओळी कानात आणि मनात वाजायला लागतात.

दिवाळी येणार अंगण सजणार

आनंद फुलणार घरोघरी

तुमच्या घरी अन् आमच्या घरी

ही गोष्ट तर अगदी खरी. शेजारीपाजारी फराळ तयार करण्यासाठी मदत करायला जाणे आणि पहाटेच्यावेळी तो देवाला दाखवून नंतर एकमेकांकडे घेऊन जाणे यातली मजा काही और असते. नरकचतुर्दशीच्या पहाटे रेडिओवर नरकासूर वधाचं आख्यान असलेलं कीर्तन असतं. खासगी वाहिन्या आणि यूट्यूब किंवा सोशल नेटवर्किंगच्या काळातही ते असतंच. त्या वेळी गडद अंधारात जेव्हा एक एक दिवा लावला जातो तेव्हा पं. अभिषेकी बुवांच्या स्वरातलं, अनेक प्रात:कालीन रागांचं मिश्रण असलेलं

दिवे लागले रे दिवे लागले

तमाच्या तळाशी दिवे लागले

दिठींच्या दिशा खोल तेजाळताना

कुणी जागले रे कुणी जागले

हे गाणं ऐकणं ही पर्वणी असते. क्षणाक्षणाला अंधार उजळीत जाणाऱ्या छोटी छोटी प्रकाशवर्तुळं निर्माण करून पावलापुरता उजेड देणाऱ्या दिव्यांचं चलत्चित्र म्हणजे हे गाणं. हे गीत म्हणजे अंधाराचं पांघरूण हळुवार उचलत नेणं आहे. स्फोट झाल्यासारखा किंवा विजेच्या दिव्यांचा भगभगीत उजेड नाहीच मुळी. कणाकणाने उजाडत जाणं म्हणजे काय हे यातून कळतं. आता उजाडणार आहे. चांदवा नसला तरी सूर्यप्रकाश येणार आहे हे कळणं म्हणजे दिवाळी. मनातला अंधार जाऊन त्या जागी सद्बुद्धीचा, विवेकाचा उजेड वाढत जाणे म्हणजे तर खरीखुरी दीपावली होय. हीच दिवाळी आपल्या मनात जागी रहावी म्हणून पावसाळ्याच्या अंधारपर्वाची सुरुवातच दीपपूजन करून होते. दररोज संध्याकाळी शुभंकरोती कल्याणम् म्हणताना दीपज्योती नमो:स्तुते म्हणत दिव्याला पहिला नमस्कार केला जातो व चातुर्मास संपता संपता भरपूर प्रमाणात दिवे उजळून या पर्वाची सांगता होते. कारण पावसाळा संपून भरपूर सूर्यप्रकाशाचे दिवस सुरू झालेले असतात. सुगी होऊन गेलेली असते. बळीराजाचं राज्य येऊदेत म्हणून

दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी

म्हटलं जात असतं. या पारंपारिक गाण्याला खूपवेळा वेगवेगळ्या चाली दिल्या जातात त्या यासाठीच की ते शब्दच तसे आहेत.

तबकामध्ये इथे डोलती निरांजनाच्या वाती

दिव्यादिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती

म्हणत म्हणत दीपावली पाडवाही येतो. ‘ओवाळीते मी लाडक्या भाऊराया’ म्हणत भाऊबीजही येते. आणि मग गाणं लागतच राहतं. ऐकू येतच राहतं

आली दिवाळी हो??

आली दिवाळी मंगल काळी

आनंद झाला घरोघरी.

-अपर्णा परांजपे-प्रभु

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article