तालुक्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी
वार्ताहर/किणये
तालुक्यात शनिवारी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पवनपुत्र हनुमान की जय, बजरंग बली की जय... असा जयघोष गावांमध्ये करण्यात आला. तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये असलेल्या हनुमान व मारुतीच्या मंदिरांमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. पहाटे काकड आरती, भजन, सायंकाळी प्रवचन, कीर्तन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये हनुमान व मारुती मंदिरे आहेत. हनुमान जयंतीनिमित्त या मंदिरांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच फुलाहारांची सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात आंब्यांच्या पानांची आंबोती व केळीची झाडे बांधली होती. शनिवारीच हनुमान जयंती असल्यामुळे भक्तांमध्ये अधिक उत्साह दिसून आला.
पहाटेपासूनच हनुमान जयंतीच्या सोहळ्याला गावागावांमध्ये प्रारंभ झाला. मारुतीला रुद्राभिषेक, पूजा, महाआरती करण्यात आली. महिलांनी पाळणा गीत म्हटले. तसेच सायंकाळी हरिपाठ, भजन व प्रवचन कार्यक्रम झाले. वाघवडे येथील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी अभिषेक व महाआरती करण्यात आली. महिलांनी पाळणा गीत म्हटले. जांबोटी रोड नावगे क्रॉस शिवाजीनगर येथील पंचमुखी हनुमान मंदिर व खानापूर रोड, महावीर नगर, ब्रह्मनगर येथील हनुमान मंदिरात पहाटे अभिषेक, त्यानंतर महाआरती करण्यात आली. दुपारी 12 नंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. याचबरोबर खादरवाडी क्रॉस येथील हनुमान मंदिर, किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, शिवनगर, झाडशापूर, देसूर, नंदीहळळी, हलगा, बस्तवाड, बेळगुंदी राकसकोप, बेळवट्टी, कावळेवाडी, बिजगर्णी, इनाम बडस गावांमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा झाला.