खानापूर शहरासह तालुक्यात हनुमान जन्मोत्सव उत्साहात
खानापूर : शहरासह तालुक्यात हनुमान मंदिरात शनिवार दि. 12 रोजी पहाटे हनुमान जन्मोत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळ्यासाठी तसेच बजरंग बलीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सर्व हनुमान मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. माऊतीनगरमध्ये स्वयंभू हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी पहाटे स्वयंभू हनुमानाची नित्यपूजा झाल्यावर जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यानंतर दिवसभर भाविकांना तीर्थप्रसादाचे वाटप करून सायंकाळी महाआरती करण्यात आली. तसेच लक्ष्मी मंदिराजवळील माऊती मंदिरात पहाटे जन्मोत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिरात पूजा-अर्चा, अभिषेक करण्यात आला. या ठिकाणीही सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. याशिवाय येथील रेल्वेस्टेशननजीक असलेल्या हनुमान मंदिरात जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मंदिराचा कळसारोहण करण्यात आला होता.
यानिमित्त हनुमान जयंतीच्या मुहुर्तावर विशेष पूजा, अभिषेक आयोजित करण्यात आला होता. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हेते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तसेच मलप्रभा नदीकाठावरील आर. पी. जोशी यांच्या माऊती मंदिरातही हनुमान जन्मोत्सव सोहळा थाटात पार पडला. याशिवाय जांबोटी रोडवरील मलप्रभा क्रीडांगणाच्या आवारातील माऊती मंदिरातही जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. याठिकाणीही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शिवाय लक्ष्मीनगरमधील साई हनुमान मंदिरातही जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. ग्रामीण भागातही हनुमान जयंती उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यामध्ये देवनगर-जळगा येथे शुक्रवारी भजनी भारुड व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन केले होते. शनिवारी पहाटे काकड आरती झाल्यावर बलभीमाला पाळण्यात घालण्यात आले. सकाळी 6 वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा झाला. दुपारी महाप्रसादासह संगीत भजनाचे आयोजन केले होते. चापगाव, बेकवाड, शिरोली, लोकोळी, मणतुर्गा, हेम्माडगा, यडोगा येथेही हनुमान जयंती साजरी करण्यात आली.