अनगोळ येथे हनुमान जन्मोत्सव उत्साहात
विविध स्पर्धांचे आयोजन : गल्लोगल्ली रथाची महिलांकडून पूजा : रथोत्सवात नागरिक सहभागी
बेळगाव : अनगोळ येथे हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आंबिल गाडे, रथ ओढणे व बैलांची परदांडी मजल, गुलालाची उधळण करत हलगीच्या आणि डॉल्बीच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी पहाटे जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री हनुमान जयंतीनिमित्त रघुनाथ पेठ, राजहंस गल्ली, हणमण्णावर गल्ली, झेरे गल्ली, भांदूर गल्ली, लोहार गल्ली येथील मंडळांनी आंबिल गाड्यांसमोर सजविलेल्या बैलजोड्यांची मिरवणूक काढली. महिलांनी आरती करून नारळ वाढविले. सर्व गाडे गांधी स्मारक येथे आले. यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांच्यावतीने उत्कृष्ट बैलजोडी, उत्कृष्ट गाडा आणि उत्कृष्ट हलगी वादन स्पर्धा घेण्यात आली. सर्व वादकांचे आकर्षक, सुमधूर वादन झाले. पाहुणे म्हणून शेतकरी बांधव व पंच कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
आकर्षक बैलजोडी स्पर्धा
1) सुरेश जायाण्णाचे, 2) मोहन बडमंजी, 3) आनंद यल्लमण्णावर, 4) सुनील राघोजी, 5) रतन यल्लमण्णावर, 6) लक्ष्मण बाळेकुंद्री, 7) जितेंद्र गुंडप्पणावर 8) महावीर हणमण्णावर, 9) राजू भेंडीगेरी, 10) पंकज चौगुले यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले.
आकर्षक गाडा
1) राजहंस गल्ली, 2) रघुनाथ पेठ, 3) हणमण्णावर गल्ली या मंडळांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले.
हलगी वादन
1)लोहार गल्ली, 2) झेरे गल्ली, 3)राजहंस गल्ली या वादकांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले रविवारी दुपारी गाड्यासमोर सजविण्यात आलेल्या बैलजोड्यांची परदांडी मजल मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. यावेळी रघुनाथ पेठ, राजहंस गल्ली, हणमण्णावर गल्ली, भांदूर गल्ली, लोहार गल्ली, झेरे गल्ली या मंडळांनी सजविलेल्या बैलजोड्यांची हलगी मजल आणि डॉल्बीच्या निनादात मिरवणूक काढून मारूती गल्ली येथील मारूती मंदिराला भेट देऊन पूजा केली. आणि गावात मिरवणूक काढण्यात आली.
मारूती मंदिरच्या रथाची पूजा
अनगोळ ग्रामदेवता श्री मारूती मंदिर, मारूती गल्ली येथील रथाची मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा करून मिरवणुकीला सुरूवात झाली. युवकांनी रथ ओढण्यास सुरूवात केली. लोहार गल्ली, भांदूर गल्ली, भेंडीगेरी गल्ली, सुभाष गल्ली, हणमण्णावर गल्ली, मारूती गल्ली येथे रथ पोहचला. यावेळी प्रत्येक गल्लीतील महिलांनी व नागरिकांनी रथाची पाणी घालून श्रीफळ वाढवून पूजा केली. यावेळी रथासमोर डॉल्बीच्या निनादात युवक गुलालाची उधळण करीत थिरकताना पहावयास मिळाले. हनुमान युवक मंडळ व्यायाम शाळा, मारूती गल्ली यांच्यावतीने रथ फिरविण्यात आला. यावेळी मारूती गल्ली येथील युवक तसेच मंडळाचे पंच मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते.