हंसिका मोटवानीने आडनावात केला बदल
दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री हंसिका मोटवानीने स्वत:च्या आडनावाच्या स्पेलिंगमध्ये किरकोळ बदल केला आहे. परंतु चाहत्यांचे लक्ष तिच्या या कृतीने वेधून घेतले आहे. हा बदल हंसिकाने उद्योजक पती सोहेल कथूरियासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चेदरम्यान करण्यात आला आहे. तिने हा बदल वैयक्तिक कारणाने केला आहे का, एखाद्या ज्योतिषाच्या सल्ल्यातून केला आहे हे मात्र स्पष्ट झालेले नाही. हंसिकाने स्वत:च्या आडनावाचे स्पेलिंग अधिकृत स्वरुपात अपडेट केले आहे. अंक ज्योतिषासाठी नावात बदल करणे कलाकारांदरम्यान सामान्य प्रकार असतो. हंसिकाचे आयुष्य सध्या अनेक घटनांमुळे प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे. अशा स्थितीत तिने आडनावाच्या स्पेलिंगमध्ये बदल केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे. हंसिकाने बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. ती ‘शाका लाका बूम बूम’ टीव्ही शोनंतर ऋतिक रोशनचा चित्रपट ‘कोई मिल गया’मध्ये दिसून आली होती. मग 2007 साली तिने अल्लू अर्जुनसोबत ‘देसामुदुरु’ चित्रपटात काम केले होते. तमिळ आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील ती प्रसिद्ध अभिनेत्री आहे.