Satara News | बसस्थानकातील गर्दीत हातसफाई; सातारा जिल्ह्यात सापळा रचून महिला चोरट्याला ठोकल्या बेड्या
पर्समधून १४ लाखांचे सोने चोरणारी साताऱ्याची महिला अटकेत
कराड -बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेत प्रवाशाच्या पर्समधील सुमारे १४ लाख ६१ हजार ८५० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या संशयिताचा चिपळूण पोलिसांनी पर्दाफाश केला. सातारा जिल्ह्यात सापळा रचत मंगल ऊर्फ पोलिसांनी संशयितशोभा अंकुश साठे (वय ६०, रा. भाटघर, ता. खंडाळा, जि. सातारा) हिला अटक केले.
तिच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,वैष्णवी विश्वनाथ शिंदे (वय ४७, रा. साईश्रद्धा बिल्डिंग, कावीळतळी, चिपळूण) या ११ एप्रिल रोजी दुपारी सुमारे ३.२० वाजण्याच्या सुमारास तिवरे जाणाऱ्या बसमध्येचढत असताना त्यांच्या खांद्यावरील पर्समधील दागिन्यांची छोटी पर्स संशयिताने गर्दीचा फायदा घेत हिसकावली. याबाबत चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सीसीटीव्ही फुटेजसह पोलिसांचे कसब या गुन्ह्याचा तपास करताना चिपळूण पोलिसांनी प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरिक्षण केले. बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना चोरी नेमकी कशी झाली आहे याची माहिती मिळाली. त्यानुसार संशयित महिलेच्या वर्णनावरून तिचा माग काढण्यास पोलिसांनी सुरूवात केली.
पोलिसांच्या अत्यंत गोपनीय तपासात संशयित महिला ही सातारा जिल्ह्यातील भाटघर येथील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित महिलेला पकडण्यासाठी चिपळूण पोलिसांचे पथक सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील भाटघर येथे आले. पोलिसांनी अगदी काही कळायच्या आत संशयित महिलेला ताब्यात घेतले.पोलिसांनी संशयित महिलेच्या घराची झडती घेतली असता चोरीस गेलेले सर्व दागिने तिच्या घरात आढळले. यानंतर पोलिसांनी पंचनामा करत दागिने जप्त केले. या प्रकरणी संशयित महिलेला अटक करण्यात आली असून तिच्याकडे अधिक सखोल चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामूनी, उपविभागीय पोलीस अधिकारी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मेंगडे यांच्या नेतृत्वात तपास अधिकारी ओम आघाव यांच्या पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.