पूरस्थिती योग्यरित्या हाताळा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या
कलबुर्गी, विजापूर, यादगीर जिल्ह्यांतील अनेक गावांत पूरस्थिती : उद्या मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाला देणार भेट
बेंगळूर : कृष्णा आणि भीमा नदीकाठी निर्माण झालेली पूरपरिस्थिती योग्यरित्या हाताळण्यासह आवश्यक बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी अधिकाऱ्यांना दिले. कलबुर्गी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसासह महाराष्ट्रातील उजनी आणि नीरा जलाशयातून कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे कलबुर्गी, विजापूर आणि यादगीर जिल्ह्यांतील अनेक गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महसूल मंत्री कृष्णभैरेगौडा, राज्य सरकारच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश आणि कलबुर्गी जिल्हाधिकाऱ्यांना परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासह आवश्यक बचाव आणि मदत कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, मंगळवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. जिल्हाधिकारी आणि जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त भागांना वैयक्तिकरित्या भेट देऊन तातडीने कार्यवाही करावी. जिल्हा प्रभारी सचिवांनी तात्काळ जिल्ह्याला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना द्याव्यात, अशी सूचनाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज खात्याचे सचिव आणि पाटबंधारे खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनीही घटनास्थळी भेट द्यावी. नागरिकांसह पशुधनाचे नुकसान टाळण्यासाठी सतर्कतेचे उपाय हाती घ्यावेत. पूरबाधितांसाठी अन्न केंद्रे सुरू करून पशुधनासाठी आवश्यक चारा उपलब्ध करून द्यावा, असेही ते म्हणाले.