हंदिगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव 14 एप्रिलपासून
नवीन शस्त्रांची वाद्यासह मिरवणूक : एकूण सात गावांचा सहभाग असणार
बेळगाव : हंदिगनूर (ता. बेळगाव) येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 14 एप्रिल 2026 पासून 22 एप्रिल 2026 पर्यंत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. ही यात्रा हंदिगनूरसह म्हाळेनट्टी, बोडकेनट्टी, कट्टणभावी, कुरीहाळ खुर्द, कुरीहाळ ब्रुद्रुक व होसोळी अशा एकूण सात गावांचा सहभाग असणार आहे. यात्रेची घोषणा केल्यापासून ग्रामस्थ व भक्तांमध्ये यात्रेची आतुरता वाढली असून सध्या संपूर्ण परिसरात यात्रेची लगबग दिसून येत आहे. यात्रेच्या नियोजनासाठी यात्रा उत्सव समितीची स्थापना करण्यात आली असून त्यामध्ये 45 जणांचा समावेश आहे. यात्रेनिमित्त नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून गावातील विविध कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. ग्रामस्थांतून जमा होणाऱ्या वर्गणीतून यात्रा होणार आहे. त्याकरिता 15 ते 20 कार्यकत्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तसेच यात्रेसाठी वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांची नुकताच वाद्यासह मिरवणूक काढून विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी सर्व ग्रामस्थ, रेणुका महिला भक्त, तरुण कार्यकर्ते व कमिटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते. यात्राकाळात लावण्यात येणारे पाळणे, ओटी भरण्याचे साहित्य, विविध खाद्य पदार्थांच्या गाड्या यासंबंधी दुकानदारांकडून करार करण्यात आला आहे. तसेच कमिटीचे पदाधिकारी श्री महालक्ष्मी देवीचा रथ ठरविणे, मंडप व गावातील विकासकामे यात्रेपूर्वी करून घेण्यासाठी आमदार व खासदार यांची भेट घेण्यामध्ये गुंतले आहेत. तब्बल 58 वर्षांनंतर होणाऱ्या यात्रेनिमित्त नवीन घरे बांधणे, जुण्या घरांची डागडुजी करणे, रंगकाम यासाठी दिवसरात्र कार्यरत तयारी सुरू आहे. सात गावांच्या या यात्रेला होणारी भाविकांची गर्दी टाळण्यासाठी यात्रा कमिटी आतापासूनच नियोजनाच्या तयारीला लागले आहेत. यासाठी दर सोमवारी मंदिरांमध्ये बैठकीचे नियोजन सुरू आहे.