Karad Crime : उंब्रजमध्ये बेड्या ठोकलेल्या आरोपीची पोलिसांच्या हातावर तुरी
उंब्रज पोलीस ठाण्यातून आरोपी अनिकेत लोहार पळाला
कराड : अत्याचाराच्या गुन्ह्यात उंब्रज पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीने पोलिसांना चकवा देत हातातील बेड्यांसह पळ काढला. पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर गोटे (ता. कराड) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री ही घटना घडली. पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकड्न शोध सुरू आहे. अनिकेत प्रकाश लोहार (वय २३, रा. कोळे, ता. कराड) अपसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उंब्रज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात कोळे येथील अनिकेत लोहार या आरोपीला पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती. त्याला वैद्यकीय चाचणीसाठी उंब्रजच्या प्राथमिक आरोग्यकेद्रात व तेथून कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी शासकीय वाहनातून संबंधित आरोपीला परत उंब्रज पोलीस ठाण्यात नेत होते.
त्यावेळी गोटे गावच्या हद्दीत पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाला.अपघातानंतर वाहनातील पोलीस कर्मचारी खाली उतरले. त्यावेळी संधीचा गैरफायदा घेत आरोपी अनिकेत लोहार याने हातातील बेड्यांसह वाहनातून खाली उडी घेत महामार्गाच्या पूर्वकडे पळ काढला. हा प्रकार लक्षात येताच पोलिसानी त्याचा पाठलाग केला. मात्र, उसाच्या शेतातून अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला.