For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाफिझ सईदला भारताकडे सोपवा

07:00 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
हाफिझ सईदला भारताकडे सोपवा
Advertisement

भारताची पाकिस्तानकडे अधिकृतरित्या मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिझ सईद याला भारताच्या आधीन करा, अशी अधिकृत मागणी केंद्र सरकारने पाकिस्तानकडे केली आहे. यासंदर्भात भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने पाकिस्तानला मागणीपत्र पाठविल्याची माहिती आहे. हाफिझ सईद हा भारताला सर्वाधिक हवा असलेला दहशतवादी आहे. तसेच तो कुख्यात आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. अमेरिलाही तो हवा असून अमेरिकेने त्याला पकडून देणाऱ्यास 1 कोटी डॉलर्सचे (साधारणत: 8.3 कोटी रुपये) इनाम लावले आहे. पाकिस्तानने त्वरित त्याला भारताच्या आधीन करण्यासाठी कायदेशीर प्रत्यार्पण प्रक्रियेचा प्रारंभ करावा आणि त्याला पुढील कारवाईसाठी भारताकडे देण्यात यावे, असे भारताने आपल्या मागणी पत्रात स्पष्ट केले आहे.

Advertisement

कराराची उणीव

2008 मध्ये मुंबई हल्ला झाल्यापासून भारताने अनेकदा हाफिझ सईद याचा ताबा देण्याविषयी पाकिस्तानकडे मागणी केली आहे. तथापि, दोन्ही देशांमध्ये प्रत्यार्पण करार झालेला नाही. परिणामी, भारताची मागणी पाकिस्तानवर बंधनकारक नाही. त्यामुळे आजवर ती त्या देशाने मान्य केलेली नाही. मात्र, सध्याच्या वातावरणात भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढला आहे. त्यामुळे भारताने सईद याची मागणी पाकिस्तानकडे केली आहे. आता पाकिस्तान या मागणीसंबंधी कोणती भूमिका घेणार, हे आगामी काही दिवसांमध्ये समजणार आहे.

अनेकदा अटकेत

हाफिझ सईद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याने त्याच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी पाकिस्तान सरकारवर भारतासमवेतच आंतरराष्ट्रीय दबावही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आजवर अनेकदा पाकिस्तान सरकारने त्याच्यावर पोलीस कारवाई केली आहे. जुलै 2029 मध्ये त्याला पाकिस्तानच्या आर्थिक गुन्हे प्राधिकरणाने सादर केलेल्या एका प्रकरणात 11 वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. आणखी एका पाकिस्तानी न्यायालयाने त्याला 31 वर्षांच्या कारावासाची शिक्षाही दिली आहे. तथापि, पाकिस्तान सरकारच्या बोटचेप्या धोरणांमुळे या शिक्षा केवळ कागदावर राहिल्या आहेत. मध्यंतरीच्या काळात त्याला स्थानबद्ध करण्यात आले होते. पण अनेकदा त्याची कारागृहातून सुटकाही करण्यात आली आहे.

पुत्रही दहशतवादी घोषित

हाफिझ सईद याचा मुलगा तल्हा सईद याला भारताने गेल्या वर्षी आपल्या बेकायदा कृत्ये विरोधी कायद्याअंतर्गत (युएपीए) दहशतवादी म्हणून घोषित केले होते. तल्हा सईदही भारताला हवा आहे. सध्या तो पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी मिळविण्याच्या प्रयत्नांमध्ये असल्याची माहिती आहे.

Advertisement
Tags :

.