हमास दहशतवादी अल-इस्साचा खात्मा
हल्ल्याच्या अखेरच्या सूत्रधारालाही इस्रायलने संपविले
वृत्तसंस्था/ तेल अवीव
7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या अखेरच्या सूत्रधाराचाही खात्मा केल्याचे इस्रायलच्या सैन्याकडून सांगण्यात आले आहे. गाझावरील हवाई हल्ल्यात हमासचा वरिष्ठ कमांडर हखम मुहम्मद इस्सा अल-इस्सा मारला गेला आहे. अल-इस्सा हा हमासच्या सैन्यशाखेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. इस्साने हमासच्या सैन्यदलाची निर्मिती, प्रशिक्षणाचे नेत्त्व केले आणि 7 ऑक्टोबर 2023 च्या नरसंहाराचा कट रचला होता असे इस्रायलकडून सांगण्यात आले.
7 ऑक्टोबर 2023 च्या नरसंहारात सामील सर्व दहशतवाद्यांचा शोध घेणे आणि त्यांना संपविण्याचे काम जारी राहणार असल्याचे आयडीएफने म्हटले आहे. तर अल-इस्सासोबत त्याची पत्नी अन् नातूही हवाई हल्ल्यात ठार झाला असल्याचे समजते.
अल-इस्साने दक्षिण इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या भीषण हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हल्ल्यात 1200 हून अधिक इस्रायली मारले गेले होते आणि सुमारे 250 इस्रायलींचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. यानंतर इस्रायलने गाझामध्ये स्वत:ची सैन्य मोहीम सुरू केली, जी अजूनही जारी आहे.
इस्साने गाझापट्टीत हमासच्या सशस्त्र दलाच्या निर्मितीच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले होते. प्रशिक्षण मुख्यालयाचा प्रमुख म्हणून त्याने काम केले होते. अल-इस्सा हा हमासच्या क्रूर अल-कासिम ब्रिगेडच्या मिलिट्री अकॅडमीच्या सह-संस्थापकापैकी एक होता.