हमास नेत्याचे कुटंबीय टार्गेट
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात तीन पुत्रांसह चार नातवंडे ठार
वृत्तसंस्था /गाझा, तेल अवीव
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते इस्माईल हानिया यांचे तीन मुलगे आणि चार नातवंडे मारली गेली आहेत. इस्रायलच्या संरक्षण दलाने गुरुवारी ही माहिती दिली. हमासच्या लष्करी शाखेचा सेल कमांडर अमीर हानिया याच्यासह हमासचे योद्धा मोहम्मद हानिया आणि हाजेम हानिया अशी मृतांची नावे सांगण्यात आली आहेत. तसेच निर्वासित छावणीवर केलेल्या हल्ल्यात हानियाची चार नातवंडे मृत झाली आहेत. इस्रायलने बुधवारी रात्री उशिरा केलेल्या हवाई हल्ल्यात हमास प्रमुख इस्माईल हानिया याच्या कुटुंबीयांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायली लष्कराने गाझामधील अल-शाती छावणीजवळ एका कारवर हवाई हल्ला केला. यामध्ये इस्माईल हानिया याचे तीन मुलगे, तीन नाती आणि एका नातवाचा मृत्यू झाला. खुद्द हानियानेच कुटुंबीयांवरील हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हानियाचे तीन मुलगे दहशतवादी होते असे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. अमीर हानिया हा हमासमध्ये स्क्वाड कमांडर होता. तर, हाझेम आणि मोहम्मद हानिया हे योद्धे होते. हे तिघेही मध्य गाझावर हल्ला करणार होते. यातील एक इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवण्यातही सामील होता. इस्माईल हानियाने कतारी मीडिया हाऊस ‘अल जझीरा’शी बोलताना आपल्या तीन मुलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली. तसेच ‘आम्ही न डगमगता या मार्गावर चालू राहू. आमच्या मागण्या स्पष्ट आहेत. चर्चेने काही बदल घडू शकतात असे शत्रूला वाटत असेल तर तो त्याचा गैरसमज आहे. माझ्या मुलांना टार्गेट केल्याने हमासला आपली भूमिका बदलण्यास भाग पाडता येईल, असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहेत. माझ्या मुलांचे रक्त आमच्या लोकांच्या रक्तापेक्षा प्रिय नाही.’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही बाजूंनी मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा
गाझा शहरातील निर्वासित छावणीजवळ हाझेम, अमीर आणि मोहम्मद हानिया त्यांच्या कुटुंबीयांसह मारले गेले. मृत्यूची नोंद प्रथम अल जझीराने केल्यानंतर हमासने पुष्टी केली. तसेच तिघे मध्य गाझा भागात दहशतवादी कारवाया करण्यासाठी जात असताना त्यांच्यावर हल्ला केल्याचे आयडीएफने सांगितले. दरम्यान, हमासचे नेते इस्माईल हनिया यांनी इस्रायलवर बदल्यापोटी आपल्या तीन मुलांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या हत्यांमुळे हमासवर आपली भूमिका मवाळ करण्यासाठी दबाव आणता येणार नाही, असे ते म्हणाले.
हानियाला एकूण 13 मुले
हमासचे राजकीय नेते इस्माईल हानिया यांना एकूण 13 मुले आहेत. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धात त्यांनी आतापर्यंत 60 कुटुंबीयांना गमावले आहे. इतर पॅलेस्टिनींना ज्या वेदनांचा सामना करावा लागत आहे, त्याच वेदना त्यालाही सहन कराव्या लागल्या आहेत. 2013 मध्ये हानिया यांची हमासच्या उपप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. चार वर्षांनंतर 2017 मध्ये हमासचे निर्णय घेणाऱ्या ‘शुरा कौन्सिल’ने त्यांची हमासच्या प्रमुखपदी नियुक्ती केली. तेव्हापासून ईस्माईल हानिया हा दोहामध्ये राहणारा हमासचा प्रमुख आहे.
अनेकांकडून शोकभावना
हानियाचे कुटुंबीय ईद साजरी करण्याच्या निमित्ताने घरी जात असताना इस्रायलने हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. दरम्यान, तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी हानिए यांच्या मुलाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. इस्रायलला त्याच्या मानवतेविऊद्धच्या गुन्ह्यांसाठी कायद्यासमोर निश्चितपणे जबाबदार धरले जाईल, असे एर्दोगन यांनी म्हटले आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे.