इस्रायलच्या हल्ल्यात हमास नेता सालेह ठार
वृत्तसंस्था/ बैरूत
लेबनॉनची राजधानी बैरूतमधील उपनगर दाहियामध्ये इस्रायलने घडवून आणलेल्या ड्रोन हल्ल्यात हमासचा वरिष्ठ नेता सालेह अल-मरौरी मारला गेला आहे. या हल्ल्यात एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतेंमध्ये अल कसम ब्रिगेडचा पदाधिकारी समीर फिंदी अबु आमेर आणि अज्जम अल अकरा अबु अम्मार यांचाही समावेश आहे.
हिजबुल्लाहचा प्रमुख सैयद हसन नसरल्लाहने या हल्ल्याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याचे सिद्ध झाल्यावर लढाई आणखी तीव्र होईल असे त्याने म्हटल आहे. सालेह मारला गेल्याने इस्रायलसोबत युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेवरून सुरू असलेल्या चर्चेसंबंधी हमास पुन्हा स्वत:च्या जुन्या भूमिकेवर परतला आहे.
गाझामध्ये स्थायी युद्धविरामाशिवाय आम्ही काहीच मान्य करणार नाही. स्थायी स्वरुपात युद्ध थांबल्यावरच इस्रायली ओलिसांची सुटका होईल असे हमासचा नेता इस्माइल हानियाने म्हटले आहे. युद्धविराम आणि ओलिसांच्या सुटकेकरता सध्या कतार आणि इजिप्त हे मध्यस्थीची भूमिका बजावत आहेत. या दोन्ही देशांच्या प्रयत्नांमुळेच यापूर्वीच एक आठवड्याचा युद्धविराम झाला होता आणि 105 इस्रायली ओलिसांची मुक्तता होऊ शकली होती. हमास आणि इस्लामिक जिहादच्या ताब्यात सध्या 128 इस्रायली नागरिक आहेत. सालेह हा हमासच्या सैन्य शाखेच्या संस्थापकांपैकी एक मानला जात होता. लेबनॉनमधून तो हमाससाठी कारवाया घडवून आणत होता.