Kolhapur : उचगाव येथे हमालाची ट्रक अपघातात दुर्दैवी मृत्यू
उचगाव पुलावर भाडेकरू हमालावर ट्रकचा धक्का
उचगाव: ट्रक पाठीमागे घेत असताना पाठीमागील चाकाखाली सापडून हमाल जागीच ठार झाला. नितीन राजाभाऊ गायकवाड (वय ३३, रा. उचगाव, मूळ तारापूर, पंढरपूर) असे मृताचे नांव आहे. शनिवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास उचगांव येथे ही घटना घडली. छातीवरून चाक गेल्याने नितीनचा जागीच मृत्यू झाला. याची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली.
अधिक माहिती अशी, मूळचे पंढरपूर येथील नितीन गायकवाड हे पत्नी, दोन मुलांसोबत उचगाव परिसरात भाडेकरू म्हणून राहण्यास आहेत.हमालीचे काम करून ते कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात. शनिवारी ते कामावर गेले नव्हते. दुपारी साडेतीनच्या सुमारास उचगाव पुलाकडून सर्व्हस रोडने पायी निघाले होते. याचवेळी ट्रक चालक गणपतसिंग चौहान ट्रक मागे घेत होते. बाजूने चाललेले नितीन गायकवाड यांना ट्रकचा धक्का लागल्यामुळे ते खाली कोसळले.
ट्रकचे पाठिमागील चाक त्यांच्या छातीवरून गेल्याने नितीन गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी सीपीआरमध्ये आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान गांधीनगर पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले असून, या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गांधीनगर पोलीस ठाण्यात सुरु होते.