खुल्या गटात हल्याळ संघ तर वजनी गटात देसूरचा संघ विजेता
नंदगड येथे कबड्डी स्पर्धा : 32 संघांचा सहभाग
वार्ताहर/नंदगड
येथील कबड्डी स्पर्धेमध्ये खुल्या गटात हल्याळचा संघ विजयी ठरला तर 60 किलोवजन गटात देसूर येथील संघ विजेता ठरला आहे. या कबड्डी स्पर्धेत खुल्या गटाच्या स्पर्धेसाठी 14 संघांनी तर 60 किलो वजनी गटासाठी 18 संघांनी सहभाग दर्शविला होता. नंदगड येथील दीपावली क्रीडामहोत्सवानिमित्त खुल्या गटात व 60 किलो वजन गटात कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. खुल्या गटात हल्याळचा संघ विजेता ठरला. तर बिदरभावीचा संघ उपविजेता ठरला. 60 किलो वजन गटामध्ये देसूरचा संघ विजयी ठरला. तर यामध्ये तुर्केवाडीचा संघ उपविजेता ठरला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
या स्पर्धेत अष्टपैलू खेळाडू म्हणून सुशांत तिरवीर (बिदरभावी), उत्कृष्ट पकडपट्टू संकेत लोकूळकर (बिदरभावी) तर उत्कृष्ट चढाईपट्टू एल्वीन डिसोजा यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी तरुण मंडळ नंदगडचे अध्यक्ष पी. के. पाटील होते. यावेळी लैला साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सदानंद पाटील, उद्योजक किशोर हेब्बाळकर, प्रशांत लक्केबैलकर, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, पीएसआय बदामी, आर. बी. पाटील, सुहास पाटील, संदीप पारिश्वाडकर, गुंजाप्पा पाटील, भरमाजी पाटील, नागो पाटील, किरण पाटील, मन्सूर ताशिलदार, प्रभू पारिश्वाडकर आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.