For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर

हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी भूसंपादन प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे सादर
Advertisement

कणकवली : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या हळवल रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जोडरस्त्याकरिता आवश्यक भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. सुधारित आखणीनुसार भूसंपादनाचा परिपूर्ण प्रस्ताव महसूल विभागाकडे तातडीने सादर करण्याचे आदेश पालकमंत्री नीतेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी हा प्रस्ताव प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्याकडे सादर केला.

Advertisement

राज्याच्या अर्थसंकल्पात भूसंपादनासाठी सुमारे 4 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी 75 लाखांची अनामत रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल विभागाकडे वर्ग केली आहे. हळवल फाटा रेल्वे उड्डाणपुलासाठी प्राथमिक गरजेनुसार सुरुवातीला 46 गुंठे जमीन भूसंपादित केली जाणार आहे.

2014 पासून उड्डाणपूल वापराविना

हळवल फाटा येथील रेल्वे फाटकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी जोडरस्ता नसल्याने हा पूल 2014 पासून वापराविना पडून आहे. दुतर्फा जोडरस्ता करण्याच्या कामाबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी 21 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.

Advertisement

या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे, भूसंपादन अधिकारी, बाधित होणारे स्थानिक जमीनमालक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्र्यांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या जोडरस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश दिले होते. तसेच 24 ऑगस्टपर्यंत भूसंपादनाचा प्रस्ताव महसूल विभागाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

थेट वाटाघाटीतून भूसंपादनाचा प्रस्ताव

कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांनी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांची भेट घेऊन हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यासाठी थेट खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव सादर केला.

दरम्यान, हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या दुतर्फा जोडरस्त्याच्या कामासाठी खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मार्ग निधीअंतर्गत सुमारे 20 कोटींचा निधी मंजूर करण्याची शिफारस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

भूसंपादनाचा प्रस्ताव सादर झाल्याने आता या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे 14 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे.

Advertisement
Tags :

.