हालसिद्धनाथ यात्रेची पालखी सोहळ्याने सांगता
आप्पाचीवाडी-कुर्ली येथे भाविकांची मांदियाळी : पाच दिवस पार पडले विविध धार्मिक विधी : उत्सवस्थळी ढोलवादन, भंडाऱ्याची उधळण
वार्ताहर/कोगनोळी
कर्नाटक-महाराष्ट्रासह अन्य राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली (ता. निपाणी) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेची 22 ऑक्टोबर रोजी मानकरी, पुजारी व भाविकांच्या उपस्थितीत सांगता झाली. गेल्या पाच दिवसांपासून सुरु असणाऱ्या या यात्रेत नाथांचे अनेक धार्मिक कार्यक्रम, ढोलवादन, वालंग, गजनृत्य, हेडाम खेळणे असे विविध कार्यक्रम पार पडले. रविवारी उत्तर रात्री नाथांची पहिली भाकणूक तर सोमवारी उत्तर रात्री नाथांची दुसरी भाकणूक डोणे महाराज (वाघापूर) यांनी कथन केली. त्यानंतर मंगळवारी सकाळी 7 वाजता घुमट मंदिरात तिसरी अखेरची भाकणूक झाली. गेल्या पाच दिवसात यात्रेसाठी व भाकणुकीसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली होती. सोमवारी दिवसभर महानैवेद्याचा कार्यक्रम झाला.
यावेळी पारंपरिक पद्धतीने सायंकाळी 5 वाजता उत्सवस्थळी ढोलवादन व भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. त्यानंतर नाथांच्या दोन्ही पालख्यांची व सबिन्याची श्री हालसिद्धनाथ व श्री महालक्ष्मी मंदिर प्रदक्षिणा झाली. सायंकाळी 6 वाजता वाड्यातील मंदिरात नाथांची मूर्ती स्थानापन्न झाली. त्यानंतर कुर्लीतील पालखी सोहळा मार्गस्थ झाला. तत्पूर्वी, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डोणे महाराज यांच्या हस्ते प्रमुख मानकऱ्यांच्या उपस्थितीत कर तोडून पाच दिवस सुरु असलेल्या यात्रेची उत्साहाने सांगता करण्यात आली. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ग्राम पंचायत प्रशासन, यात्रा कमिटीचे पदाधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या नियोजनामुळे यात्रा व यात्रेतील धार्मिक विधी सुरळीत पार पडले. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.
डोणे महाराजांची भाकणूक
जग दुनियेत तिसरं महायुद्ध होईल. निष्पाप लोकांचा बळी जाईल. टोळी युद्ध चालेल, धुमसत राहील. लाकूड सोन्याचं होईल, ताजव्यातनं विकल. आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी होईल, अशी भाकणूक डोणे महाराजांनी कथन केली.