हलशी-हलशीवाडी लक्ष्मी यात्रा आजपासून
आठवडाभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन : आज पहाटे अक्षतारोपण
वार्ताहर/हलशी
कदंबकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हलशी-हलशीवाडी परिसरात श्री महालक्ष्मी यात्रेचा भव्य सोहळा उद्या बुधवार दि. 8 पासून मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. बुधवार दि. 8 ते गुरुवार दि. 16 पर्यंत चालणाऱ्या या यात्रेसाठी ग्रामस्थांनी जोरदार तयारी केली आहे. भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. इतिहासप्रसिद्ध आणि पौराणिक महत्त्व लाभलेल्या हलशी गावात सुंदर व प्राचीन मंदिरांची समृद्ध परंपरा आहे. या मंदिरांपैकी श्री महालक्ष्मी देवी मंदिर हे विशेष आकर्षण असून, यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिराचे आकर्षक रंगकाम करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी 6 वाजून 23 मिनिटानी अक्षतारोपण होणार आहे. अक्षतारोपणासाठी खानापूर तालुका व परिसरातील हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यात्रेनिमित्त हलशी व हलशीवाडी गावांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. यात्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, लोककला सादरीकरण यांची मेजवानी यात्रेचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
भाविकांसाठी विविध कार्यक्रम
हलशी-हलशीवाडी लक्ष्मीदेवी यात्रोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील भक्त आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा ऐतिहासिक आणि धार्मिक महोत्सव बुधवार दि. 8 एप्रिलपासून सुरू होऊन गुरुवार दि. 16 एप्रिलपर्यंत संपन्न होणार आहे. यात्रेची सुरुवात बुधवार दि. 8 एप्रिल रोजी सकाळी 6:23 वाजता सूर्योदयाच्या वेळी अक्षतारोपण विधीने होणार आहे. या विधीत देवीची पूजा, मंत्रोच्चारण आणि पारंपरिक पद्धतीने अक्षतारोपण करण्यात येणार आहे. 9 एप्रिल रोजी दुपारी 2 वा. श्री लक्ष्मीदेवी रथावर विराजमान होऊन रथोत्सवाला प्रारंभ होईल. सायंकाळी देवी गदगेवर बसण्याचा धार्मिक विधी पार पडणार आहे. या सोहळ्dयासाठी आमदार तसेच खासदार विश्वेश्वर हेगडे-कागेरी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व लखन जारकीहोळी यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम
यात्रेच्या प्रत्येक दिवशी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता पुणे येथील प्राचार्य गणेश शिंदे यांचे प्रवचन, दि. 11 रोजी रात्री 9 वाजता ‘संग्या बाळ्dया’ कन्नड नाटक, दि. 12 रोजी रात्री 9 वाजता कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होईल. दि. 13 रोजी दुपारी 3 वाजता खळ्dयाच्या कुस्ती, रात्री 9 वाजता खुल्या डान्स स्पर्धा, 14 रोजी सकाळी 9 वा. नरसेवाडी माळ येथे ठगरांची झुंज शर्यत, रात्री सांस्कृतिक कार्यक्रम, 15 रोजी दुपारी 3 वा. पारंपरिक ‘आंबिल गाडे’, रात्री 10 वा. रिया पाटील भांबार्डा यांचा संगीत नृत्य कार्यक्रम होणार आहे. यात्रेचा सांगता दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी महालक्ष्मीदेवी सीमेकडे प्रस्थान करून होणार आहे.
यात्राकाळात नंदगड धरणातून पाणीपुरवठा
हलशी-हलशीवाडी (ता. खानापूर) परिसरात सध्या सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली असताना, नंदगड धरणातून पाणी पुरवठा करून प्रशासन व शेतकऱ्यांनी एक आदर्श सहकार्याचे उदाहरण घालून दिले आहे. हलशी-हलशीवाडी या गावांमध्ये दरवर्षी उन्हाळ्dयात पाणीटंचाई भेडसावते. यात्राकाळात ही समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेत समाजसेवक राजू पेडणेकर यांनी पुढाकार घेत लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी तसेच नंदगड येथील शेतकऱ्यांनी नंदगड धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. याला सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकारी आणि शेतकऱ्यांनी मानवतेचा दृष्टिकोन स्वीकारत पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. उन्हाळी पिकांचा हंगाम सुरू असतानाही, नंदगड परिसरातील शेतकरी मारुती मणेरकर, बसवराज हलशीकर, बाळू हुंदरे, गौतम पाटील, जोतिबा हलशीकर आदींनी यात्रेसाठी पाणी उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे.