For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पहलगाम’चे नवे पाकिस्तान कनेक्शन

06:37 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘पहलगाम’चे नवे पाकिस्तान कनेक्शन
Advertisement

तपासात नवे पुरावे उघड, पाकिस्तानचा हात स्पष्ट

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानने केलेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या तपासात अनेक नवे धागेदोरी हाती लागल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) दिली आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांकडून मोबाईलवरुन पाकिस्तानशी संपर्क केला जात होता. पाकिस्तानातून दहशतवाद्यांना सूचना केल्या जात होत्या, असे तपासात स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन एनआयएकडून केले गेले.

Advertisement

दहशतवाद्यांना मोबाईल फोन पाकिस्तानकडूनच देण्यात आला होता. या फोनची खरेदी पाकिस्तानातील सिरत प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने केली होती. या खरेदीसाठी पाकिस्तानातीलच फैसल बँकेने अर्थसाहाय्य केले होते. 1 जानेवारी 2021 या दिवशीच हा व्यवहार झाला होता. यावरुन पहलगामचा हल्ला हा एका व्यापक आणि दीर्घकालीन कारस्थानाचा भाग होता, हे आता उघड होत आहे.

दोन्ही फोन्स हस्तगत

एनआयए आणि जम्मू-काश्मीर पोलीस यांनी या दहशतवादी हल्ल्यात उपयोगात आणण्यात आलेले दोन्ही मोबाईल फोन्स हस्तगत केले आहेत. या फोन्सच्या तपासणीतून, या हल्ल्याशी पाकिस्तान कसा संबंधित आहे, याची पूर्ण माहिती उपलब्ध झाली आहे. या फोन्सची खरेदी 2021 मध्ये झालेली असली, तरी ते बराच काळ कार्यरत करण्यात आले नव्हते. 22 एप्रिलला, पहलगाम हल्ल्याच्या दिवशीच काही काळासाठी ते कार्यरत (अॅक्टिव्ह) करण्यात आलेले होते. हल्ला झाल्यानंतर ते पुन्हा बंद करण्यात आले. हल्लेखोरांच्या स्थानाचा पत्ता तपास अधिकाऱ्यांना लागू नये, म्हणून ही व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

तीन दहशतवादी समाविष्ट

पहलगाम हल्ल्यात समावेश असणाऱ्या दहशतवाद्यांची संख्या 3 होती. त्यांची नावे फैसल जाट ऊर्फ सुलेमान शाहृ हबीब ताहीर (जिब्रान) आणि हमझा अफगाणी अशी त्यांची नावे आहेत. हे सर्व तीन दहशतवादी 28 जुलै 2025 या दिवशी काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत ठार झाले होते. त्यांनी हल्ल्याच्या वेळी उपयोगात आणलेल्या या दोन मोबाईल फोन्ससंबंधीची कागदपत्रे अनेक बाबी स्पष्ट करत आहेत. त्यांची खरेदी पाकिस्तानातील कंपनीने केल्याने या हल्ल्यात पाकिस्तानचा किती मोठा हात होता, यावर आता नव्याने प्रकाश पडलेले आहे.

Advertisement
Tags :

.