हलगा महालक्ष्मी देवी यात्रा येत्या मार्चमध्ये
यात्रा 18 मार्चपासून 26पर्यंत 9 दिवस चालणार : गावात दोन दिवस वार पाळणूक
वर्ताहर/सांबरा
हलगा येथे 18 मार्च 2025 पासून होणाया महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त सोमवारी गावामध्ये विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. त्यानिमित्त गावामध्ये दोन दिवस वार पाळण्यात आले आहेत. देवस्थान पंच समिती, महालक्ष्मी यात्रोत्सव समिती तसेच गावचे देसाई बंधू यांच्या संयुक्त विद्यमाने ही पूजा करण्यात आली. ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीची यात्रा 11 वर्षानंतर होणार आहे. 18 मार्च ते 26 मार्च दरम्यान नऊ दिवस यात्रा होणार आहे. सोमवार दि. 3 रोजी महालक्ष्मी मंदिर मध्ये महालक्ष्मी देवीचे पूजन करून आरती करण्यात आली. त्यानंतर गावातील सर्व देवस्थान, मंदिरे व स्थळांचे विधिवत पूजन केले व गावच्या सर्व सीमांचे स्थिर पूजन करण्यात आले. यावेळी हाल्गा देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष धाकलू बिळगोजी, सदस्य, महालक्ष्मी यात्रोत्सव समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील सर्व भाविकांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन देवस्थान पंच समिती व महालक्ष्मी यात्रोत्सव समितीच्यावतीने करण्यात येत आहे.
आज भव्य मिरवणूक
मंगळवार दि. 4 रोजी सकाळी 7 वाजता मरगाई मंदिर येथे विधिवत पूजन व आरती झाल्यानंतर मिरवणुकीला सुऊवात होणार आहे. ही मिरवणूक सवाद्य मरगाई गल्लीतून, लक्ष्मी गल्ली महालक्ष्मी मंदिर येथे सकाळी 9 वाजता आल्यानंतर महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचे विधिवत पूजन, अभिषेक करून आरती होणार आहे. त्यानंतर महालक्ष्मी देवीच्या मूर्तीच्या रंगरंगोटीच्या कार्याला सुऊवात होणार आहे.