हलगा कलमेश्वर यात्रेला उत्साहात प्रारंभ
आंबील गाड्यांची मिरवणूक : मंदिरासमोर आज इंगळ्याचा कार्यक्रम
वार्ताहर/सांबरा
हलगा येथे सोमवार दि. 14 पासून ग्रामदैवत कलमेश्वर यात्रेला प्रारंभ झाला असून सोमवारी आंबील गाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. परंपरेप्रमाणे यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी सायंकाळी आंबील गाड्यांच्या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. लक्ष्मी गल्ली येथील चौगुले बंधूंच्या बैलगाड्यांचे पूजन प्रगतशील शेतकरी धनाजी चौगुले व ग्रा. पं. सदस्य सदानंद बिळगोजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला. यानंतर आंबील गाड्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. हलगा ग्राम पंचायतने मागील काही दिवसांत कोणत्याही यात्रेत व सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी बंदीचा ठराव केल्याने ही यात्रा डॉल्बीमुक्त करण्यात येत आहे. आंबील गाड्या काढणाऱ्या मंडळींनी पारंपरिक करडी मजल लावून या गाडा मिरवणुकीला सुरुवात केली आहे. डॉल्बीमुक्त यात्रेमुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवार दि. 15 रोजी दुपारी 4 पर्यंत ही मिरवणूक निघणार आहे. चार नंतर मिरवणुकीची सांगता होणार असून त्यानंतर मानाच्या सासनकाठी व पालखी मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या उपस्थितीत ही मिरवणूक गावातील प्रमुख गल्लीतून जाऊन सायंकाळी 5 वाजता कलमेश्वर मंदिर समोर इंगळ्याच्या कार्यक्रम होणार आहे. यानंतर अनेक भाविक कलमेश्वरचे दर्शन घेतात. यानंतर यात्रेची सांगता होणार आहे.