For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हलगा-बस्तवाड सर्व्हिस रस्ता ठरला अवजड वाहनांचा पार्किंग स्थळ

09:53 AM Oct 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
हलगा बस्तवाड सर्व्हिस रस्ता ठरला अवजड वाहनांचा पार्किंग स्थळ
Advertisement

वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय : अनेकदा अपघाताच्या घटना : ग्रामपंचायतीने तोडगा काढण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/किणये

सुवर्ण विधानसौध जवळ असलेला हलगा-बस्तवाड सर्व्हिस रस्ता हा स्थानिक वाहनधारक व नागरिकांसाठी महत्त्वाचा रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर अलिकडे अवजड वाहन थांबत आहेत. याचा त्रास स्थानिक वाहनधारकांना होऊ लागला आहे. सदर अवजड वाहनांच्या चालक व वाहकाला सांगूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा सर्व्हिस रस्ता अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी आहे का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे. अलारवाड क्रॉसपासून हलगा-बस्तवाड हा सर्व्हिस रस्ता गेलेला आहे. या रस्त्यावरून रोज हलगा, बस्तवाड, कोंडुसकोप, तारिहाळ, खमकारहट्टी, के. के. कोप, धामणे, अवचारहट्टी, नंदिहळ्ळी भागातील वाहनधारकांची रोज मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कोंडुसकोप, बस्तवाड व हलगा या तीन गावातील वाहनधारकांना बेळगावला ये-जा करण्यासाठी या सर्व्हिस रस्त्याचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावरून वाहनांची वर्दळ नेहमीच असते.

Advertisement

या भागात कंपन्या, गोडावून असल्याने अवजड वाहनांचे थांबे

या सर्व्हिस रस्त्यावर 12, 16, 10 चाकी ट्रक, डंपर अशी अवजड वाहने थांबलेली असतात. त्यामुळे स्थानिक वाहनधारकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे. या भागात काही कंपन्या आहेत. तसेच गोडावून आहेत. याकरिता सदर अवजड वाहने या भागात येत असतात, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. रस्त्याच्या बाजूलाच अवजड वाहने थांबविण्यात येतात. यामुळे समोरासमोरुन वाहने आल्यानंतर मार्ग काढणे कठीण होऊ लागले आहे. तसेच काही वेळेस वाहतुकीची कोंडीही निर्माण होत आहे. या रस्त्याच्या बाजूलाच बस्तवाड, हलगा या भागातील शेतकऱ्याच्या शेती जमिनी आहेत. बैलगाडी तसेच जनावरांनाही या रस्त्यावरून ये-जा करावी लागते.

ग्राम पंचायतीने पुढाकार घ्यावा

सर्व्हिस रस्त्यावर अवजड वाहने थांबत असल्यामुळे अनेकवेळा किरकोळ अपघाताच्या घटना घडलेल्या आहेत. या अवजड वाहनांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्यासाठी हलगा व बस्तवाड या दोन्ही ग्रामपंचायतीच्यावतीने योग्य तो तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

अवजड वाहनधारकांनी अन्य ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करावी

या भागात अवजड वाहनांची वाहतूक वाढली आहे. या अवजड वाहनधारकांनी सर्व्हिस रस्त्यावर वाहने न थांबविता स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करून त्याठिकाणी वाहने थांबवावीत. यामुळे सर्व्हिस रस्ता मोकळा होईल आणि स्थानिक वाहनधारकांची वाहतूक सुरळीत होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Advertisement
Tags :

.