आकाश आनंद, शम्स मुलानीची अर्धशतके, मुंबई 396
वृत्तसंस्था, मुंबई
रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथील ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या इलाईट ड गटातील सामन्यात मंगळवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर रेल्वेने पहिल्या डावात 2 बाद 116 धावा जमविल्या. तत्पूर्वी मुंबईचा पहिला डाव 396 धावांवर आटोपला. रेल्वेचा संघ अद्याप 280 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 8 गडी खेळावयाचे आहेत.
मुंबई संघाने 6 बाद 247 या धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांच्या शेवटच्या चार गड्यांनी 149 धावांची भर घातली. मुंबईच्या पहिल्या डावात रघुवंशी, सर्फराज खान, आकाश आनंद, मुलानी यांनी अर्धशतके झळकविली. रघुवंशीने 2 षटकार आणि 11 चौकारांसह 78, सर्फराज खानने 7 चौकारांसह 55, आकाश आनंदने 7 चौकारांसह 52 तर मुलानीने 7 चौकारांसह 71 धावा जमविल्या. कर्णधार सिद्धेश लाडने 4 चौकारांसह 47 तसेच सक्सेनाने 4 चौकारांसह 39, कोटीयानने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. रेल्वे संघातर्फे सांगवानने 4, चौधरीने 3 तर आदर्श सिंगने 2 गडी बाद केले.
त्यानंतर रेल्वेने आपल्या पहिल्या डावाला सावध सुरुवात केली. साहेब युवराज सिंग आणि विवेक सिंग यांनी सलामीच्या गड्यासाठी 80 धावांची भागिदारी केली. 38 धावांवर असताना विवेक सिंग दुखापतीमुळे निवृत्त झाला. युवराज सिंगने 4 चौकारांसह 33 तर विवेक सिंगने 8 चौकारांसह 38 धावा जमविल्या. मोहम्मद सैफ 5 चौकारांसह 29 धावांवर ख्घ्sळत आहे. गोयल 8 धावांवर तंबूत परतला. मुंबईतर्फे मुलानी आणि कोटियान यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक: मुंबई प. डाव 396 (रघुवंशी 78, मुलानी 71, सर्फराज खान 55, आकाश आनंद 52, लाड 47, सक्सेना 39, अवांतर 15, सांगवान 4-88, चौधरी 3-81, आदर्श सिंग 2-83), रेल्वे प. डाव 2 बाद 116 (साहेब युवराज सिंग 33, विवेक सिंग दुखापतीने निवृत्त 38, सैफ खेळत आहे 29, मुलानी व कोटियान प्रत्येकी 1 बळी).
