कर्णधार जुरेल, पडिक्क्ल यांची अर्धशतके
वृत्तसंस्था, ख्राईस्टचर्च
येथे शनिवारपासून सुरु झालेल्या चार दिवसांच्या दुसऱ्या अनाधिकृत कसोटी सामन्यात कर्णधार ध्रुव जुरेल आणि देवदत्त पडिक्कल यांच्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर भारत अ संघाने पहिल्या डावात न्यूझीलंड अ संघाविरुद्ध 7 बाद 291 धावा जमविल्या.
न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाने या मालिकेतील पहिल्या सामन्यात दर्जेदार कामगिरी केली होती. दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड अ ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीचा यशस्वी जैस्वाल पुन्हा यावेळी अपयशी ठरला. पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो शिटच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी केली. साई सुदर्शनने 3 चौकारांसह 41 धावा जमविल्या. यश राठोड 2 चौकारांसह 13 धावांवर बाद झाला. शिटने पडिक्कलचा त्रिफळा उडविला. त्याने 12 चौकारांसह 80 धावा झळकविल्या. शिटने रविचंद्रन स्मरणला खाते उघडण्यापूर्वी पायचीत केले. भारत अ संघाची यावेळी स्थिती 5 बाद 137 अशी केविलवानी होती. न्यूझीलंड अ संघातील शीटने प्रभावी गोलंदाजी केली. त्याने वॉशिंग्टन सुंदरला 8 धावांवर पायचीत केले.
कर्णधार ध्रुव जुरेलने मानव सुथार समवेत सातव्या गड्यासाठी 62 धावांची भागिदारी केली. लिनॉक्सने सुथारला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 22 धावा जमविल्या. आकाशदीप आणि जुरेल यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरताना आठव्या गड्यासाठी अभेद्य 69 धावांची भागिदारी केली. जुरेल 3 षटकार आणि 11 चौकारांसह 99 धावांवर तर आकाशदीप 1 षटकार आणि 3 चौकारांसह 25 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंड अ संघातर्फे शिटने 50 धावांत 4 तर रँडेल, मॅके आणि लिनॉक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - भारत अ प. डाव 7 बाद 291 (ध्रुव जुरेल खेळत आहे 99, पडिक्कल 80, साई सुदर्शन 41, मानव सुथार 22, आकाशदीप खेळत आहे 25, शिट 4-50).
