For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शान मसूद, इमामुल हक यांची अर्धशतके

06:45 AM Jul 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
शान मसूद  इमामुल हक यांची अर्धशतके
Advertisement

पाकचा संघ अद्याप 112 धावांनी पिछाडीवर, मोहम्मद अलीचे चार बळी

Advertisement

वृत्तसंस्था, टेरोबा

येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर पाकने पहिल्या डावात 3 बाद 199 धावा जमविल्या असून इमामुल हक आणि शान मसुद यांनी शानदार अर्धशतके झळकविली. तत्पूर्वी विंडीजचा पहिला डाव 311 धावांत आटोपला. पाकतर्फे मोहम्मद अलीने 4 तर मोहम्मद अब्बासने 3 गडी बाद केले.

Advertisement

आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. या पहिल्या सामन्यातील खेळाच्या पहिल्या दिवशी पाऊस आणि अंधूक प्रकाशामुळे केवळ 64 षटकांचा खेळ झाला. विंडीजने 3 बाद 194 या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला आणि त्यांचा पहिला डाव 98.5 षटकांत 311 धावांत आटोपला. विंडीजचे सात फलंदाज 107 धावांमध्ये बाद झाले.

विंडीज संघातील केविन हॉज आणि शाय हॉप या जोडीने चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भर घातली. हॉजने 183 चेंडूत 9 चौकारांसह 84 धावा झळकविल्या. हॉपचे शतक केवळ 8 धावांनी हुकले. त्याने 182 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 92 धावा जमविल्या. अमिर जंग्गूने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21, ग्रिव्हेसने 3 चौकारांसह 15, कर्णधार चेसने 2 चौकारासह 10 तर शमार जोसेफने 13 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 29 अवांतर धावा मिळाल्या. पाकतर्फे मोहम्मद अलीने 50 धावांत 4, मोहम्मद अब्बासने 63 धावांत 3, खुर्रम शेहजादने 66 धावांत 2 आणि अमिर जमालने 81 धावांत 1 गडी बाद केला. विंडीजने उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्राअखेर 96 षटकांत 7 बाद 303 धावा जमविल्या होत्या. विंडीजचा डाव चहापानापूर्वीच संपुष्टात आला.

पाकच्या डावाला अझान आवेश आणि इमामुल हक यांनी सुरूवात करून दिली. पण तिसऱ्याच षटकांत विंडीजच्या रॉस्टने आवेशला खाते उघडण्यापूर्वी त्रिफळाचीत केले. त्यानंतर इमामुल हक आणि शान मसुद या जोडीने संघाचा डाव सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 31.1 षटकांत 155 धावांची दीशतकी भागिदारी केली. चहापानावेळी पाकने 19 षटकांत 1 बाद 96 धावांपर्यंत मजल मारली होती.

खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये पाकने आणखी दोन गडी गमविले. शमार जोसेफने इमामुल हकला झेलबाद केले. त्याने 102 चेंडूत 7 चौकारांसह 63 धावा जमविल्या. विंडीजच्या सेल्सने कर्णधार बाबर अझमला हॉपकरवी झेलबाद केले. त्याने 38 चेंडूत 3 चौकारांसह 23 धावा जमविल्या. शान मसुद 137 चेंडूत 11 चौकारांसह 88 धावांवर खेळत असून सलमान आगाने अद्याप आपले खाते उघडले नाही. 48 षटकांत पाकने पहिल्या डावात 3 बाद 199 धावा जमविल्या. विंडीजतर्फे रॉच, सेल्स आणि शमार जोसेफ यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : विंडीज प. डाव- सर्वबाद 311 (शाय हॉप 92, हॉज 84, शमार जोसेफ नाबाद 23, चंद्रपॉल 21, जंग्गू 21, ग्रिव्हेस 15, चेस 10, अवांतर 29, मोहम्मद अली 4-50, मोहम्मद अब्बस 3-63, खुर्रम शेहजाद 2-66, अमिर जमाल 1-81), पाक प. डाव 48 षटकांत 3 बाद 199 (इमामुल हक 63, शान मसुद खेळत आहे 88, बाबर अझम 23, अझान आवेश 0, अवांतर 25, केमर रॉच, सेल्स आणि शमार जोसेफ प्रत्येकी 1 बळी).

Advertisement
Tags :

.