कर्णधार शान मसूद, शफीक यांची अर्धशतके
दुसरी कसोटी, पाक प. डाव 5 बाद 259
वृत्तसंस्था / रावळपिंडी
सोमवारपासून येथे सुरू झालेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर शान मसूद आणि अब्दुल्ला शफीक यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान पाकने पहिल्या डावात 5 बाद 259 धावा जमविल्या. द.आफ्रिकेचे क्षेत्ररक्षण गचाळ झाले. त्यांनी मसूद आणि शफीक यांना चार जीवदाने दिली. या मालिकेत पाकने पहिली कसोटी जिंकून द.आफ्रिकेवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच मिळविली आहे.
या दुसऱ्या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. द.आफ्रिकेच्या वेगवाग गोलंदाजाने भेदक गोलंदाजी केली. अब्दुल्ला शफीक आणि इमामुल हक या सलामीच्या जोडीने पाकच्या डावाला साधव सुरूवात करुन देताना 12.3 षटकात 35 धावांची भागिदारी केली. हार्मेरने इमामुल हक्कचा त्रिफळा उडविला. त्याने 2 चौकारासह 17 धावा जमविल्या.
अब्दुल्ला शफीक आणि कर्णधार शाम मसुद यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरताना दुसऱ्या गड्यासाठी 111 धावांची शतकी भागिदारी केली. उपाहारावेळी पाकची स्थिती 30 षटकात 1 बाद 95 अशी होती. उपाहारानंतर शान मसुदने आपले अर्धशतक 83 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने झळकविले. शफीकने आपले अर्धशतक 120 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी 201 चेंडूत नोंदविली.
खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाकने 2 फलंदाज गमविताना 82 धावा जमविल्या. चहापानावेळी पाकने 62 षटकांत 3 बाद 177 धावा जमविल्या. हार्मेरने शफीकला व्हेरेनीकरवी झेलबाद केले. त्याने 146 चेंडूत 4 चौकारांसह 57 धावा जमविल्या. केशव महाराजने बाबर अझमला झेलबाद केले. त्याने 3 चौकारांसह 16 धावा केल्या.
खेळाच्या शेवटच्या सत्रात पाकने आणखी दोन गडी गमविताना 82 धावांची भर घातली. दिवसअखेर पाकने पहिल्या डावात 91 षटकात 5 बाद 259 धावा जमविल्या. केशव महाराजने या शेवटच्या सत्रात कर्णधार शान मसूदला जेनसनकरवी झेलबाद केले. त्याने 176 चेंडूत 3 षटकार आणि 2 चौकारांसह 87 धावा जमविल्या. रबाडाने मोहम्मद रिझवानला पायचीत केले. त्याने 2 चौकारासह 19 धावा केल्या. सौद शकील आणि सलमान आगा या जोडीने शेवटच्या अर्ध्यातासात संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. सौद शकील 105 चेंडूत 3 चौकारांसह 42 तर सलमान आगा 1 चौकारांसह 10 धावांवर खेळत आहे. द.आफ्रिकेतर्फे केशव महाराज आणि हार्मेर यांनी प्रत्येकी 2 तर रबाडाने 1 गडी बाद केला.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात 11 गडी बाद करणारा द.आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज मुथुसॅमी रावळपिंडीच्या खेळपट्टीवर प्रभावी गोलंदाजी करु शकला नाही. कर्णधार मारक्रेमने त्याला केवळ 4 षटके टाकण्याची संधी दिली. मात्र या सामन्यात पुनरागमन करणाऱ्या केशव महाराजाने मात्र 2 बळी मिळविले. खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर द.आफ्रिकेने दुसरा नवा चेंडू घेतला आणि त्यांना या नव्या चेंडूवर 1 बळी मिळाला. मोहम्मद शफीकला रबाडाच्या गोलंदाजीवर पहिले जीवदान स्टब्जने दिले त्यावेळी शफीकने खातेही उघडले नव्हते. तसेच शफीक आज खरोखरच सुदैवी ठरला. जेनसनचा वेगवान चेंडू शफीकच्या बॅटला चाटून यष्टीला आदळला. पण बेल्स पडले नाहीत. यामुळे शफीकला आणखी एक जीवदान मिळाले. या कसोटीसाठी पाकने हसन अलीला वगळून असीफ आफ्रिदी या नवोदित फिरकी गोलंदाजाला संघात स्थान दिले.
संक्षिप्त धावफलक: पाक प. डाव 91 षटकात 5 बाद 259 (शान मसूद 87, अब्दुल्ला शफीक 57, अमामुल हक 17, बाबर आझम 16, रिझवान 19, सौद शकील खेळत आहे 42, सलमान आगा खेळत आहे 10, अवांतर 11, केशव महाराज व हार्मेर प्रत्येकी 2 बळी, रबाडा 1-41)