For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्धा पायडल ते महागडी सायकल

11:02 AM Jun 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
अर्धा पायडल ते महागडी सायकल
Advertisement

व्यायामासाठी सर्वात स्वस्त पर्याय : शून्य प्रदूषणामुळे पसंती

Advertisement

बेळगाव : प्रत्येकानेच आपल्या बालवयात अर्धा पायडल मारत सायकल शिकण्याच्या कसरती केल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सायकल हा अविभाज्य घटक होता. जसे शहरीकरण वाढले तसे पाचवी-सहावीतील मुलेही दुचाकी घेऊन फिरू लागली. दुचाकी हातात आली. परंतु, आरोग्याच्या आणि प्रदूषणाच्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या रुपात सायकलची आवड निर्माण झाली. काही जण मात्र केवळ स्टेटससाठी सायकलचा वापर करताना दिसतात. असे असताना सद्यस्थितीत आरोग्यासाठी सायकलचा वापर होणे गरजेचे बनले आहे. 15 ते 20 वर्षांपूर्वी बेळगाव शहरात दळणवळणासाठी वाहनांच्या सुविधा नव्हत्या. त्यावेळी सायकल हा एकमेव पर्याय सर्वसामान्यांकडे उपलब्ध होता. बेळगावमध्ये ठिकठिकाणी सायकल भाडोत्री दिल्या जात होत्या. तासानुसार सायकलचे भाडे आकारले जात होते. त्याचबरोबर सायकलची दुरुस्ती व पंक्चर काढणाऱ्यांची संख्याही शहरात अधिक होती. सध्या मात्र सायकल चालविण्याचे प्रमाण कमी झाल्याने दुरुस्तीची दुकाने कमी झाल्याचे चित्र दिसते. पूर्वी पंधराशे ते दोन हजार रुपयांमध्ये चांगल्या दर्जाची सायकल मिळत होती. परंतु, आता यामध्ये नाविन्यता येत गेली. रेंजर सायकलमुळे किमतींमध्ये वाढ झाली. त्यात नव्याने दाखल झालेल्या गियरच्या सायकलने तरुणाईला भुरळ घातली. सध्या सायकलच्या किमती दुचाकीइतक्या झाल्या आहेत. तरीदेखील आरोग्य सांभाळण्यासाठी सायकलची आवश्यकता भासत आहे.

व्यायाम करण्याचा उद्देश बाजूला 

Advertisement

सायकल चालविणे हा एक उत्तम व्यायाम असल्यामुळे सायकलिंगकडे वळणाऱ्यांची संख्या वाढली. कोरोनानंतर आरोग्याला अधिक महत्त्व आल्याने मॉर्निंग वॉकसह सायकल चालविणाऱ्यांची संख्या वाढली. आता शहरासह ग्रामीण भागातही सकाळच्या प्रहरी सायकलिंग करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. मात्र, यामध्येही आधुनिकतेने शिरकाव केला असून इलेक्ट्रिक सायकलही विकत घेतल्या जात आहेत. यामुळे सायकलिंगच्या माध्यमातून शारीरिक व्यायाम करण्याचा उद्देश मात्र बाजूला फेकला गेला आहे. बेळगावमध्ये वेणुग्राम सायकलिंग क्लब व पेडलर्स क्लब अशा दोन मोठ्या क्लबमधून प्रत्येक आठवड्याला सायकल राईडचे आयोजन केले जाते. बेळगाव ते कोल्हापूर, गोवा अशा राईड करण्यात येत असतात. याबरोबरच काही सायकलपटू सोलो सायकलिंग करत इतर शहरांना भेटी देत असतात. अंदाजे 150 ते 200 सायकलपटू या क्लबच्या माध्यमातून सायकलिंग करीत आहेत. नवीन सदस्य या क्लबला जोडले जात असून सायकलविषयीची आवड दिवसेंदिवस वाढीस लागली आहे.

बेळगावमध्ये सायकल ट्रॅकचा अभाव

प्रत्येक जण आरोग्याविषयी जागरुक झाल्याने पुन्हा एकदा सायकलकडे वळला आहे. विशेषत: शहरी भागातील नागरिक सकाळच्या वेळी सायकल घेऊन फिरताना दिसून येतात. परंतु, बेळगावमध्ये म्हणावे त्या प्रमाणात सायकल ट्रॅक उपलब्ध नाहीत. उपनगरांमध्ये काही ठिकाणी स्मार्टसिटी अंतर्गत सायकल ट्रॅक उपलब्ध करून देण्यात आले. परंतु, या सायकल ट्रॅकवर विक्रेत्यांनी बस्तान बसविल्याने सायकल चालविणाऱ्यांना याचा कोणताच फायदा होत नसल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :

.