गाळवार-हळदोणा येथे दुचाकींची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
म्हापसा : गाळवार-हळदोणा परिसरात दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास तब्बल एका तासाहून अधिक विलंब झाल्याचा आरोप हळदोणा मतदारसंघाचे आमदार अॅड. कार्लोस फेरेरा यांनी केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गाळवार-हळदोणा परिसरात दोन दुचाकी समोरासमोर आल्याने हा अपघात झाला. धडक इतकी तीव्र होती की, दोन्ही वाहनांवरील तिघांना गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
रुग्णवाहिका सेवेला विलंबाचा आरोप
अपघातानंतर रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधण्यात आला. मात्र बराच वेळ उलटूनही रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली नसल्याने मृतदेह तासाहून अधिक काळ घटनास्थळीच पडून राहिल्याचा दावा आमदार फेरेरा यांनी केला. गंभीर अपघाताच्या प्रसंगी जखमींना तातडीने वैद्यकीय सेवा मिळणे गरजेचे असताना रुग्णवाहिका उपलब्ध होण्यास झालेला विलंब चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले.
या घटनेमुळे हळदोणा तसेच बार्देश परिसरातील आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. रुग्णवाहिकांची संख्या, त्यांची उपलब्धता आणि अपघातस्थळी तातडीने मदत पोहोचविण्याची यंत्रणा यांचा संबंधित विभागाने आढावा घ्यावा, अशी गरज व्यक्त केली जात आहे.
आमदार फेरेरा यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन सेवांमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली असून, अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रभावी व्यवस्था उभी करण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.