Solapur weather | सोलापूरला गारांनी झोडपले! ४३ अंशांच्या पाऱ्यात अवकाळी पावसाचा सुखद गारवा
उकाड्याने हैराण सोलापूरकरांना दिलासा
सोलापूर -सोलापूर शहराचा पारा गेल्या काही दिवसापासून ४३ अंशावर पोहोचला होता. अशातच गेल्या चार दिवसापासून सोलापुरात अवकाळी पाऊस सुरु आला आहे. मंगळवारी ऊन कमी असले तरी प्रचंड उकाड्याने दिवसभर सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही झाली. सायंकाळी मात्र वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. जणू आकाशाशी धरणीमातेचे नातेच जडल्याचा सुखद अनुभव मंगळवारी सोलापूरकरांना आला.
मंगळवारी दिवसभर उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक पंखे, कूलरचा आधार घेत होते. दुपारी चार नंतर मात्र ढगाळ वातावरण सुरु झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास शहरात सर्वत्र वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. गेल्या कित्येक वर्षानंतर सोलापुरात गारांचा पाऊस पडला. लहान मुले पडणाऱ्या गारा पकडण्याचा प्रयत्न करत होते. सापडलेल्या गारांचे फोटो सोशल मीडियात सांयकाळी चांगलेच व्हायरल झाले.
सोलापूर शहरातील बाळीवेस परिसर, अशोक चौक, नई जिंदगी,सोलापुरात सकाळपासून दुपारपर्यंत ऊन, सायंकाळी गारांचा पाऊसनवी पेठ, शेळगी, जुळे सोलापूर, सैपुल, सात रस्ता, नीलम नगर, रामवाडी, बाळेसह अन्य भागांत सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. गारांच्या पावसात लहान मुलांनी भिजण्याचा आनंद घेतला. तर उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी सायंकाळी हवेतील गारव्यामुळे सुस्कारा सोडला.
यंदा एप्रिल महिना सोलापूरकरांसाठी सर्वाधिक उष्णतेचा ठरत आहे. गेल्या १५ दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारी घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अशातच महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागातही अघोषित भारनियमन सुरू करण्यात आल्याने नागरिकांत संतापही होता. एप्रिल महिन्यात आतापर्यंत दुपारी कडक उन्हामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मंगळवारी मात्र गारांचा पाउस व वादळी वार्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावरील वर्दळ सांयकाळी तासभरासाठी बांबली होती. सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर हा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.